गारपीट झालेल्या भागात केदारेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. प्रताप ढाकणे यांनी पाहणी केली. बोधेगाव : अवकाळी पावसाने उभ्या पिकांचे नुकसा...
![]() |
गारपीट झालेल्या भागात केदारेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. प्रताप ढाकणे यांनी पाहणी केली. |
बोधेगाव :
अवकाळी पावसाने उभ्या पिकांचे नुकसान केले आहे. काढणीस आलेल्या पिकांना गारांसह झालेल्या वादळी पावसाने झोडपले. त्यात गहू, हरभरा, कांदा, बाजरी, मका आदीसह इतर चारापिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडायच्या आताच या अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसानग्रस्त भागाची ‘केदारेश्वर’ साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. प्रताप ढाकणे यांनी पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून मदत मिळवून देऊ, असे त्यांनी आश्वासन दिले.
त्यांच्या या पाहणी दौर्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यांनी ‘केदारेश्वर’ कारखान्याचे सभासद असणार्या प्रत्येक शेतकरी कुटुंबाला चार हजारांची मदत जाहीर केली.
शनिवारी (दि. २० मार्चला ) वादळी वाऱ्यासह गारपीट झाली होती. शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरातील लाडजळगाव, गोळेगाव, शेकटे खुर्द, शेकटे बुद्रुक, सुकळी या गावांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आंबा, पपईसारख्या फळबागांनाही याचा चांगलाच तडाखा बसला.
थेट मदत करणारा पहिला कारखाना
अस्मानी संकटामुळे बळीराजा खचला आहे. कोरोना पाठोपाठ गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. हे लक्षात घेऊन शासकीय मदत मिळेल तेव्हा मिळेल पण, केदारेश्वर कारखान्याने सभासदांना प्रत्येकी चार हजारांची मदत देऊन धीर दिला आहे. अशी तात्काळ मदत देणारा केदारेश्वर हा पहिलाच कारखाना आहे. चेअरमन अॅड. प्रताप ढाकणे यांनी तातडीने मदत जाहीर केल्याने शेतकऱ्यांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
पंचनामे करून सरसकट मदत व्हावी
वादळी पावसाने फळबागा आणि पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून शासनाने सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी उपस्थित शेतकर्यांनी चेअरमन अॅड. प्रताप ढाकणे यांच्याकडे केली. याबाबत पालकमंत्री यांना भेटून पाठपुरावा करू, तसेच जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ, असे आश्वासन ढाकणे यांनी दिले.
यावेळी ‘केदारेश्वर’चे उपाध्यक्ष डॉ. प्रकाश घनवट, तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, कृषी सहायक सुभाष बारगजे, गजानन चव्हाण, कामगार तलाठी बाबासाहेब अंधारे, लाडजळगावचे भाऊसाहेब क्षीरसागर, काकासाहेब तहकीक, उपसरपंच दत्ता तहकीक, गहिनीनाथ ढाकणे, शेकटेचे तात्यासाहेब मारकंडे, गोळेगावचे संजय आंधळे आदींसह शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.
COMMENTS