नाशिक : रेमडेसिविर या इंजेक्शन बाजारात प्रचंड मागणी आहे. कोरोनावर मात करण्यासाठी या इंजेक्शनची मागणी जोर धरत आहे. हीच बाब लक्षात घेऊन या इं...
नाशिक :
रेमडेसिविर या इंजेक्शन बाजारात प्रचंड मागणी आहे. कोरोनावर मात करण्यासाठी या इंजेक्शनची मागणी जोर धरत आहे. हीच बाब लक्षात घेऊन या इंजेक्शनची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. त्याडून मोठा काळाबाजार केला जात आहे. प्रशासनाने हा काळाबाजार रोखण्यासाठी काही पथके तयार केली आहेत. अनेकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. मात्र, रविवारी रेमडेसिविर चढ्या भावाने विकताना चक्क एका डॉक्टरलाच पोलिसांनी अटक केली आहे. या डॉक्टरला बाराशे रुपयांचे इंजेक्शन तब्बल २५ हजार रुपयांना विकताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई रविवारी (दि.11) रात्री करण्यात आली. रात्री उशीरा पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रविंद्र श्रीधर मुळूक (वय ४०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी डॉक्टरचे नाव आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कोरोना रुग्णांसाठी उपयोगी ठरणारे रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णांना मिळत नसताना डॉक्टरच याचा काळाबाजार करत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त होत आहे.
देवळाली कॅम्प व शहरातील रुग्णालयात दाखल रुग्णासाठी तीन रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी सामाजिक कार्यकर्ते योगेश मोहिते हे शहरात फिरत होते. त्यावेळी त्यांना एक क्रमांक मिळाला. त्यांनी त्या क्रमांकावर संपर्क साधला असता समोरील व्यक्तीने फोन कट केला. त्यानंतर काही वेळाने त्या क्रमांकावरुन मोहिते यांना फोन आला. त्यात बाराशे रुपये किमतीचे रेमडेसिव्हिर प्रति इंजेक्शन २५ हजार रुपयांना देण्याचे ठरले. हे इंजेक्शन अमृतधाम परिसरात रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास देण्यासाठी संबंधित व्यक्ती आली. मात्र मोहितेंनी यांच्याकडे अवघे १६ हजार रुपये असल्याचे सांगितले. त्यांनी संबंधितांना अमृतधाम परिसरातील अॅक्सिस बँकेच्या एटीएमवर बोलवले. यावेळी सद्गुरु हॉस्पिटलचे डॉ. रविंद्र मुळूक त्या ठिकाणी आले. डॉ. मुळूक येण्यापूर्वी या घटनेची माहिती मोहिते यांनी पोलिसांना दिली होती.
या डॉक्टरला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी सापळा लावून ठेवला. मात्र, ही बाब मुळूकच्या लक्षात येताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करत त्याला अडविला. गाडीची झाडाझडती घेतल्यानंतर त्याच्याकडे रेमडेसिविरची इंजेक्शन आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
COMMENTS