मुंबई : तुम्ही-आम्ही सर्वांनी भारतीय जीवन विमा निगम अर्थात (LIC) चा लोगो पाहिला असेल. दोन हातांमध्ये दिवा जळताना दिसतो, जणू दोन्ही हात त्य...
मुंबई :
तुम्ही-आम्ही सर्वांनी भारतीय जीवन विमा निगम अर्थात (LIC) चा लोगो पाहिला असेल. दोन हातांमध्ये दिवा जळताना दिसतो, जणू दोन्ही हात त्या दिव्याची काळजी घेण्याची हमी देत आहेत. त्याच्या खाली संस्कृत मध्ये लिहिले आहे 'योगक्षेमं वहाम्यहम्' अर्थात जीवन विमा महामंडळ गुंतवणूकीच्या सुरक्षा आणि ग्राहकांच्या समृद्धीची हमी देत आहे. दरम्यान, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (एलआयसी आयपीओ) च्या खाजगीकरणापूर्वी त्याचा लोगोत बदल करण्यात आला असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोर धरत आहे. सोशल मिडीयाच्या या पोस्टमध्ये नवीन लोगो आहे. ज्यात दोन्ही हात समोर पसरलेले आहेत. जणू कोणाकडून काही मागत आहेत. हे प्रकरण नेमकं काय आहे ते समजावून घेऊयात.
एलआयसीचे खाजगीकरण होत असल्याने उडवली जातेय खिल्ली...
संपूर्ण देशाला माहित आहे की, भारतीय आयुर्विमा महामंडळाचे खाजगीकरण होणार आहे. एलआयसी लवकरच आपला आयपीओ आणणार आहे. सरकारची नफ्यात असणारी कंपनीचे खाजगीकरण केले जात असल्याने हे ‘पोस्टर’ विनोदी पद्धतीने उपहासात्मकरित्या शेअर केले जात आहे. एकेकाळी तुमच्या गुंतवणूकीला सुरक्षितता आणि समृद्धीची हमी देणारी एलआयसीला इतरांसमोर हात पसरण्याची वेळ आली आहे, असा संदेश यातून दिला जात आहे.
खाजगीकरणासाठी CCEA ची मान्यता
केंद्रीय मंत्रिमंडळाने देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असणाऱ्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) च्या निर्गुंतवणुकीला जुलैमध्ये मंजुरी दिली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती LIC मधील भागविक्रीचे प्रमाण ठरवेल. भारतीय कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठी सार्वजनिक ऑफर (IPO) असल्याचे म्हटले जाते. एलआयसीचा आयपीओ या आर्थिक वर्षाच्या अखेरीस येऊ शकतो, ज्यामध्ये 10 टक्के वाटा पॉलिसीधारकांसाठी राखीव असेल.
सरकार यावर्षी उभारणार 1.75 लाख कोटी रुपये
चालू आर्थिक वर्षासाठी सरकारच्या निर्गुंतवणुकीचे लक्ष्य लक्षात घेता एलआयसीची सूची महत्त्वपूर्ण आहे. सरकारने चालू आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीतून 1.75 लाख कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या 1.75 लाख कोटी रुपयांपैकी 1 लाख कोटी रुपये सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय संस्थांमधील सरकारी भागविक्रीतून उभारले जातील. उर्वरित 75,000 कोटी केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या निर्गुंतवणुकीतून येतील.
COMMENTS