दिव्यांग व्यक्तींसाठी अहमदनगर महानगरपालिका प्रशासनाने कोरोना लसीकरणासाठी विशेष मोहीम राबविली आहे. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर य...
अहमदनगर : प्रतिनिधी
दिव्यांग आणि बेड रिडन व्यक्तींना कोरोना लस घेण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन विशेष मोहिमेद्वारे दिव्यांगांचे लसीकरण करण्यास महापालिका प्रशासन कटिबद्ध असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी दिली. दिव्यांग व्यक्तीना घरपोच लसीकरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
अहमदनगर महानगरपालिका आणि रेडिओ सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ऑगस्ट रोजी आयोजित लसीकरण कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते. शहरातील अनाम प्रेम संस्थेतील दिव्यांगांचे यावेळी लसीकरण करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक आणि कॉर्पोरेशन हेल्थ कमिटी चेअरमन डॉ. सागर बोरुडे, महापालिका दक्षता पथक सनियंत्रण अधिकारी शशिकांत नजान, त्यांचे पथक, डॉ. माधुरी गाढे, एस. डी. क्षेत्रे , धनेश खत्री उपस्थित होते.
व्हाट्सअॅप करा आणि घरपोच लस मिळवा
अहमदनगर महानगरपालिका आणि रेडिओ सिटी 91.1 यांनी दिव्यांग आणि बेड रिडन व्यक्तींना कोरोना लस मिळावी याकरिता विशेष मोहीम राबवली आहे. अशा लोकांना घरोघरी जाऊन त्यांचे लसीकरण केले जाणार आहे. दिव्यांग आणि बेड रिडन व्यक्तींनी लस हवी असल्यास 77 18 911 911 या क्रमांकावर नाव, वय आणि पत्ता अशी माहिती व्हाट्सअॅप मेसेजद्वारे कळवावी, असे अवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
या कार्यक्रमात आर. जे. प्रसन्ना यांनी या मोहिमेबद्दल माहिती दिली. डॉ राजूरकर यांनी लसीकरणाचे महत्व समजावून सांगितले. नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांनी हेल्थ कमिटीच्या कामाबाबत माहिती दिली.
कोरोनाच्या काळामध्ये महानगर पालिका कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी उत्तमरीत्या निभावली आहे. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन शशिकांत नजान यांनी केले आहे.
अनाम प्रेम संस्थेतर्फे अजित माने यांनी स्वागत केले. यावेळी महापालिका दक्षता पथक सहायक सूर्यभान देवघडे, नंदकुमार नेमाने, अनिल आढाव आदीसह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
महानगरपालिका व रेडिओ सिटीच्या या उपक्रमाचा जास्तीत जास्त फायदा नगरकरांनी घ्यावा असे आवाहन महापौर सौ.रोहिनीताई शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त शंकर गोरे सर्व पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
COMMENTS