कर्जुने खारे येथील लोकहितवादी प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या 2000-01 बॅचच्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच...
प्रतिनिधी : नगर
शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत नगर तालुक्यातील कर्जुने खारे येथील लोकहितवादी प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या 2000-01 बॅचच्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच उत्साहात पार पडला. गेल्या अनेक दिवसांपासून या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी माजी विद्यार्थी आणि शिक्षक प्रयत्नशील होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम लांबणीवर पडला होता.
स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने २१ वर्षानंतर सर्व माजी विद्यार्थी एकत्र आले अन बालपणीच्या आठवणीत हरवून गेले होते. खूप दिवसांनी शिक्षक, विद्यार्थी आणि वर्ग मित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अण्णासाहेब थोरात होते. नामदेव गोडे, अशोक रक्ताटे, विद्या कोरडे, सुखदेव चौधरी, मनीषा बांदल, शिल्पा सातपुते, अनिता सोनटक्के, आदी शिक्षक मेळाव्यास आवर्जून उपस्थित होते. माजी विद्यार्थी विकास निमसे यांनी जुन्या आठवणी सांगतानाच कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. वर्ग मित्रांच्या सुख- दु:खात सहभागी होण्याच्या दृष्टीने, आपुलकी आणि जवळीक निर्माण व्हावी, या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे राजेंद्र बिचुकले यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषण करतांना थोरात म्हणाले की, माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे. ही विद्यालय आणि शिक्षक म्हणून अभिमानाची बाब आहे. आमच्या हातून चांगली कर्तबगार पिढी घडली, हे पाहून माझी अध्यापन सेवा सार्थ झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
विकास पळसकर आणि अजित गाडेकर यांनी स्वागत केले. तर कुमार निमसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रदीप लांडे यांनी आभार मानले.
COMMENTS