राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस जिल्हा सरचिटणीस, युवा नेते, श्री. गौरव नरवडे प्रतिनिधी : अहमदनगर तालुक्याच्या राजकीय पटलावर नवतरुण कब...
राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस जिल्हा सरचिटणीस, युवा नेते, श्री. गौरव नरवडे |
प्रतिनिधी : अहमदनगर
तालुक्याच्या राजकीय पटलावर नवतरुण कब्जा करू पहात आहेत. प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात दंड थोपटत ‘तरुणाई’ त्यांना आव्हान देऊ पहात आहे. तालुक्याच्या राजकारणात शिरू पाहणारे मोजकेच तरुण कार्यकर्ते समाजकारणाच्या माध्यमातून सक्रीय आहेत. त्यापैकी अग्रभागी असणारे आणि अत्यल्प कालावधीत आपली स्वतःची आगळीवेगळी ओळख निर्माण करणारे युवा नेते गौरव नरवडे. गौरव हा युवा कार्यकर्ता. जेमतेम २१ वर्षे वयाचा उमदा तरुण. राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदाची धुरा आपल्या खांद्यावर पेलवत सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात झपाटून काम करत आहे. केवळ तीन – चार वर्षांच्या सामजिक जीवनात युवा कार्यकर्ता ते युवा नेता असा चकित करणारा प्रवास करणाऱ्या गौरव नरवडे यांचा १३ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या मित्र परिवाराने आणि नगर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला ‘सा. राज्यकर्ता’ने त्यांच्याशी संवाद साधला. त्या चर्चेचा संपादित अंश, खास वाचकांसाठी.
गौरव दादासाहेब नरवडे यांनी प्राथमिक शिक्षण मामाच्या गावी सोनेवाडी येथून घेतले. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी टाकळी खातगाव येथे पूर्ण केले. ते आता वैद्यकीय शिक्षणाच्या दुसऱ्या वर्षाला आहेत. कौटुंबिक परिस्थिती म्हणाल, तर अगदी जेमतेम. मात्र, गौरवने कायमच मोठ्या उंचीचे स्वप्न पाहिलेत. केवळ, नुसते स्वप्नरंजनात रमणारा हा तरुण नाही. ते स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणारा आणि प्रचंड मेहनत घेणारा तरुण, अशी ओळख त्याने निर्माण केली आहे.
लहानपणापासूनच समाजकारण आणि राजकारणाची आवड असल्याने विद्यार्थीदशेपासूनच त्यांना राजकीय नेत्यांबद्दल आकर्षण राहिले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी पक्ष संघटनेत काम करण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात ते नगर- पारनेर मतदारसंघाचे लोकप्रिय आ. नीलेश लंके यांच्या संपर्कात आले. आ. लंकेंनी गौरव सारख्या असंख्य तरुणांना अक्षरशः भुरळच घातली आहे. गौरव विद्यार्थी आघाडीचे काम करत राहिला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्न आणि अडीअडचणी महाविद्यालयीन व्यवस्थापनाकडे मांडत राहिला. गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना फी माफी आणि शैक्षणिक सवलती मिळाल्या पाहिजेत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. त्या मागणीवर गौरव आजही ठाम दिसतो.
गौरवला असणारी सामजिक जाण आणि जाणीव पक्षश्रेष्ठींनी हेरली. त्यातूनच त्यांनी गौरवला ३१ जुलै २०२० रोजी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली. मागून येऊन गौरव अनेकांना मागे टाकत झपाट्याने पुढे जातोय, हे काही विघ्नसंतोषी लोकांना रुचले नाही. गौरवच्या वाटेत अनंत अडचणी आणि काट्यांची पेरणी त्या मंडळींनी केली. मात्र, तो ‘त्या सर्वाना’ पुरून उरला. गौरवने आणखी वेगाने काम करू लागला. गावातील, पंचक्रोशीतील आणि तालुक्यातील विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी लढू लागला, वेळप्रसंगी संघर्ष केला. एकदा काम हाती घेतले तर त्याचा निपटारा केल्याशिवाय स्वस्थ न बसण्याचा गौरवचा स्वभाव असल्याने, त्याने अद्याप मागे वळून पाहिले नाही. सातत्याने आगेकूच करत आहे.
गौरवने गत वर्षी सामजिक भावनेतून, वाढदिवसाच्या निमित्त्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले. कोरोनाचे संकट ओढवलेले असताना ‘रक्ताची कमतरता भासत होती.’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत गौरवने मित्र परिवाराच्या मदतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचे ठरविले. तब्बल ९६ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.
गौरव नरवडे हा तरुण विविध सामजिक प्रश्नांवर आग्रही भूमिका घेतो, मांडतो. त्या प्रश्नावर कायमचा तोडगा निघावा, म्हणून प्रयत्न करतो. देशाच्या राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतमालाला हमीभावाची हमी मिळावी, आणि केंद्राने नव्याने लागू केलेले शेतीविषयक धोरणात बदल करावा, ते मागे घ्यावे, या मागणीसाठी संबध देशातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याने, या शेतकरी पुत्राने नेमकी व्यथा ओळखली. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नगर – कल्याण महामार्गावर रास्तारोको आंदोलन करत ‘या’ प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
गौरवचे पक्षातील आणि समाजातील महत्वाच्या व्यक्तीच्या नेहमी भेटीगाठी सत्र कायमच सुरु आहे. चर्चात्मक संवादातून तो काही नवीन गोष्टी शिकत आहे. आत्मसात करत आहे. आपले स्थानिक प्रश्न आणि समस्या मोठ्या नेत्यांच्या कानावर घालून ‘त्या’ प्रश्नांना न्याय देण्याचा तो प्रामाणिक प्रयत्न करत आहे.
गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातले आहे. या संकटाच्या काळात गौरव अनेकांच्या मदतीसाठी धावून आला. बेड उपलब्ध करून देणे, रक्त पिशव्या आणि प्लाझ्मा मिळवून देणे, गोरगरीब रुग्णांचे खाजगी रुग्णालयातील बील कमी करणे, यासारखी छोटी-छोटी पण अत्यंत महत्वाची कामे गौरवने मार्गी लावली आहेत. कोरोना रुग्णांसाठी आ. नीलेश लंके यांनी शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर उभारले. त्या ठिकाणी व्यवस्थापन करण्यातही गौरव कायम पुढे होता. या काळात त्यांनी मोलाची मदत केली. गरजू आणि गरीब रुग्णांना मोफत किंवा माफक दरात उपचार मिळावेत, यासाठी गौरव कायमच प्रयत्नशील राहिला.
केवळ दोन – चार वर्षांच्या सामाजिक जीवनात गौरवने उभारलेले काम हे खरोखरच कौतुकास्पद म्हणावे लागेल. पक्ष कार्यकारिणीतील पद वगळता हाती काही नसतानाही गौरवची ही वाटचाल अनेकांना अचंबित करणारी आहे. त्यामुळेच तालुक्यातील अनेक मोठ्या राजकीय नेत्यांची गौरववर नजर आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य कार्यक्रम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमालाही वेगळेच महत्व प्राप्त होत आहे. जिल्हा परिषद – पंचायत समितीच्या निवडणुका पाच – सहा महिन्यांवर आहेत. आगामी निवडणुकीत गौरवने निंबळक गणातून उमदेवारी करावी, अशी मित्र परिवाराने गळ घातली आहे. त्यादृष्टीने तयारीही सुरु केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या माध्यमातून गौरव आपल्या राजकीय वाटचालीचा प्रारंभ करणार, असा राजकीय जाणकारांचा कयास आहे.
तरुणांना राजकारणात संधी मिळाल्या पाहिजेत : गौरव नरवडे
आपल्या लोकशाहीप्रधान देशात तरुणांची संख्या लक्षणीय आहे. राजकारणात खांदेपालट आवश्यक आहे. सातत्याने संधी देवूनही केवळ विकासाचे ‘व्हिजन’ नसल्याने गावे अद्याप स्वयंपूर्ण होऊ शकली नाहीत. गावांना त्यांच्या हक्काचे शाश्वत उत्पन्नाचे स्रोत निर्माण व्हावेत, यासाठी राजकीय नेते प्रयत्न करताना दिसत नाहीत. तरुणांनासोबत घेत ‘ज्येष्ठ नेत्यांचा अनुभव, तरुणांचे व्हिजन’ असा समन्वय साधला तर गावांना समृद्ध केले जाऊ शकते. मात्र त्यासाठी तरुणांना राजकारणात संधी मिळाल्या पाहिजेत, असे मत युवा नेते गौरव नरवडे यांनी ‘राज्यकर्ता’शी बातचीत करतांना व्यक्त केले.
गौरवसारख्या तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार : आ. नीलेश लंके
आ. नीलेश लंके यांच्यासमवेत युवा नेते गौरव नरवडे. |
COMMENTS