प्रतिनिधी : अहमदनगर शेती पंप वीजबिलाची राज्यभर सक्तीने वसुली सुरु आहे. त्यासाठी महावितरणने शेतकऱ्यांना वेठीस धरून वीज पुरवठा खंडित केला आहे...
प्रतिनिधी : अहमदनगर
शेती पंप वीजबिलाची राज्यभर सक्तीने वसुली सुरु आहे. त्यासाठी महावितरणने शेतकऱ्यांना वेठीस धरून वीज पुरवठा खंडित केला आहे. शेतकरी कोरोना आणि नैसर्गिक आपत्ती तसेच शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने आधीच आर्थिक संकटात आहे. त्यातच महावितरणच्या आडमुठेपणाच्या भूमिकेमुळे त्रस्त झाला आहे. त्यामुळे महावितरणने आडमुठेपणाची भूमिका न घेता टप्याटप्याने वसुली करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवप्रहार संघटनेने केली आहे.
शिवप्रहार संघटनेने गुरुवारी ( दि. १८ ) श्री. काकडे (अधीक्षक अभियंता, अहमदनगर) यांना निवेदन दिले. सदरच्या निवेदनाद्वारे, महावितरणने शेती पंपाचा वीजपुरवठा खंडित केला असल्याने पिकांचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. ज्यांनी वीजबिल भरले आहे, त्यांचेही जोडणी होत नसल्याने नुकसान होत असून त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा दृष्टीने सकारात्मक भूमिका न घेतल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष संजीव भोर यांच्या नेतृत्वात नगर तालुक्यातील पदाधिकार्यांनी निवेदन दिले.
यावेळी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष घोलप, जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा कायदेशीर सल्लागार योगेश गेरंगे, महानगराध्यक्ष राम झिने, नगर तालुकाध्यक्ष विनायक सातपुते, युवक तालुकाध्यक्ष गोरख आढाव, आदिनाथ चंद्रे, राहुल आढाव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
हुकुमशाही पद्धतीने वागणे बंद करा : योगेश गेरंगे
शेती पंपाची वीज खंडित करून महावितरणचे पदाधिकारी मनमानी करत आहेत. शेतकरी वर्ग आर्थिक संकटाचा सामना करत असताना हुकूमशाही पद्धतीने वसुली मोहीम राबविणे चुकीचे आहे. अधिकाऱ्यांनी हुकुमशाहीपद्धतीचे वागणे बंद करावे, अन्यथा शिवप्रहार शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ मैदानात उतरेल. महावितरण विरोधात संजीव भोर यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हा कार्यकारिणी तथा कायदेशीर सल्लागार योगेश गेरंगे यांनी दिला.
शेतकऱ्यांना वेठीस धरू नका : संतोष घोलप
शेतकऱ्यांच्या भावना, संवेदना लक्षात घ्याव्यात. महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार खपवून घेणार नाहीत. अशी भावना व्यक्त करतानाच राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष घोलप यांनी महावितरणच्या कारभारावर ताशेरे ओढत नाराजी व्यक्त केली.
COMMENTS