बीड : शेख महंमद महाराज आजही आपल्यातच आहेत. ग्रंथ रुपाने त्यांचे विचार आपल्या भोवती वावरत आहेत. संत हे चमत्कार केल्याने श्रेष्ठ ठरत नाहीत त...
बीड :
शेख महंमद महाराज आजही आपल्यातच आहेत. ग्रंथ रुपाने त्यांचे विचार आपल्या भोवती वावरत आहेत. संत हे चमत्कार केल्याने श्रेष्ठ ठरत नाहीत तर त्यांनी साहित्य लिहीले व त्यातून समाज प्रबोधन केले, सामाजिक क्रांती घडविली म्हणून ते आज अजरामर आहेत. आपल्याला आयुष्यभर पुरेल ऐवढी साहित्य संपत्ती त्यांनी तयार करुन ठेवली पण, ही खरी संपत्तीच आपण विसरलो आहोत. ही संपत्ती आमच्या सारख्या नवोदीत युवकांच्या हाती पडली तशी ही संधी म्हणून आम्ही स्विकारली. संत शिरोमणी शेख महंमद महाराजांचे सर्व साहित्य प्रकाशित करण्याचा वसा हाती घेऊन त्यांच्या विचारांचा हा वारसा पुढे नेण्याचा निर्णय वाहिरा येथील युवकांनी घेतला आहे.
वाहिरा गावात संत शेख महंमद महाराज जन्माला यावेत हा काही योगायोग नाही. ही भूमी या संताने साहित्य शब्दांनी नांगरली आहे. या भूमीची त्यांनी मशागत केलेली आहे. या भूमीत त्यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता या सुविचाराचं बीजारोपण केलं आहे. ही भूमी निंदून विषमतेची विषवल्ली जी हरळीसारखी पसरलेली होती ती काढून टाकली आहे. ही भूमी सुपिक, सुफलीत व्हावी यासाठी या भूमीत आपल्या आयुष्य खर्ची केलं आहे. करोडो अल्पशिक्षित, अशिक्षित माणसं त्यांचे विचार जाणीवपूर्वक समजून घेवो अथवा न घेवो पण हा साहित्य विचार त्यांच्या नेणीवेतून पिढ्यान् पिढ्या प्रवाहित झाला आहे. महाराष्ट्र आजही देशात पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते ते या संतविचारांच्या प्रभावामुळेच !
योगसंग्रामातील वचन आपल्या जन्माच्या दु:खाचं निवारण करतं. अन्न, मिष्टान्न पोटाची भूक भागवतं, पण संत साहित्य मनाची भूक भागवतात. ह्रदयाची भूक भागवतात. बुद्धीची भूक भागवतात. भावनेची भूक भागवतात. अन्न शरीराचं पोषण करतं पण साहित्य मनाचं पोषण करतात, भावनेचा परिपोष करतात, ही ताकद संत साहित्यात आहे.
संत शेख महंमद महाराजांनी त्यांच्या साहित्यातून आपल्याला केवळ भक्ती शिकवली नाही तर नीती शिकवली. जगावं कसं? कशासाठी जगावं? कुणासाठी जगावं? कशासाठी लढावं आणि कशासाठी मरावं? हा विचार आपल्याला दिला. म्हणून साडे तीनशे वर्षांपूर्वी या भूमीत छत्रपती शिवरायांसारखा युगपुरुष, लोककल्याणकारी राजा जन्माला आला. या मातीतून स्वराज्य निर्माण झालं. गुलामीचा कलंक नष्ट झाला. अंधारयुगाचा अंत झाला. लाचारी दूर झाली. आपल्या पुढच्या हजारो पिढ्यांना अभिमान वाटावा असा इतिहास निर्माण झाला.
योगसंग्राम ग्रंथात योध्दा आहे आत्मा. या योध्याने मनाच्या घोड्यावर आरुढ होऊन अहंकाराशी युध्द मांडले आहे. अहंकाराच्या बाजूने सासु सत्ता आहे तर संताप व आळस हे मेहुणे आहेत. महामाया ही आई आहे. आशा, मनसा, कल्पना, तृष्णा या अहंकाराच्या बायका आहेत. शंका, लज्जा या अहंकाराच्या बहीणी आहेत. निंदा, कुचेष्टा ह्या बटीक आहेत. मान, अपमान हे कारकुन आहेत. संकल्प-विकल्प, काम-क्रोध, आळस इत्यादी अवगुणांनी युक्त असे अहंकाराचे सैन्य उभे आहे. या सैन्याशी एकट्या अहंकाराने एक चित्त करुन स्वत:मधील विकारांशी संग्राम केला व विजयी झाला तो योगसंग्राम.
योगसंग्राम या ग्रंथात 18 अध्याय असून 2301 ओव्या आहेत. या ग्रंथाची रचना श्रावण शु.15, शके 1567 (इ.स.1645) सोमवार या दिवशी सांगता पावली.
योगसंग्राम ग्रंथामध्ये संत शेख महंमद महाराज श्रोत्यांसमोर जणु काही पोथी वाचत आहेत. श्रोतेही एकचित्त करुन ते ऐकत आहेत व मनन करत असल्याचे जाणवते. याच बरोबर श्रोत्यांच्या प्रश्नीकपणाने आलेल्या शंका व त्यांचे निरसनही समोरासमोर केलेले पहायला मिळत आहे. गुरु चाँद बोधले यांच्याशी गुरुवाणीने श्रवण व गुंरुचे तोंडभरून कौतुक करुन ज्ञानार्जन करत शंकांचे समाधान करुन घेतले आहे. वेळोवेळी देवदेवतांशी नमन करतांनाच देवी सरस्वतीसह अनेक देवही चर्चेत सामील करुन घेतलेले पहायला मिळत आहे. एकंदरीत हा चर्चात्मक ग्रंथ आहे. ज्ञान, भक्ती, वैराग्य, पुराणकथा व त्यावरील वास्तव. अज्ञानी लोक अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन कशी अंध भक्ती करतात याचे उदाहरण देण्यासाठी जे देव स्वत:चे रक्षण करु शकत नाहीत ते भक्ताचे काय रक्षण करणार अशा स्वरुपाचे देवतांच्या सामर्थ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार्या प्रसंगांचे वर्णन आढळून येते.
संत शेख महंमद महाराजांनी तत्कालीन परिस्थितीत जे पाहिले, अनुभवले त्या घटनेवर परखड स्वरुपात भाष्य या ग्रंथात केले आहे. अंधश्रध्दा, कर्मकांड यांच्यावर प्रखर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. चौदाव्या अध्यायात ते म्हणतात देवता असत्या सामर्थ्यपणें । तर तोंडावर कां मुतती श्वाने। प्रसिध्द दोखोनी झकली अज्ञानें । कनिष्ठ भजन करीती ॥ योगसंग्राममध्ये वेळोवेळा विज्ञान हा शब्दप्रयोग करण्यात आला आहे याचाच अर्थ शेख महंमद महाराज हे विज्ञाननिष्ठ संत होते.
साडेचारशे वर्षापूर्वी लिहीलेला ग्रंथ आजच्या विज्ञान युगात मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहेत. योगसंग्राममध्ये समाज जीवनाचे सार महाराजांनी सांगितले आहे. सामाजिक, धार्मिक, राजकीय, वैज्ञानिक, ऐतिहासिक आदी सर्व विषय अगदी सोप्या भाषेत व चर्चात्मक पध्दतीने शेख महंमद महाराजांनी सांगितले आहेत. बहुसाल जिवंत ते योगेश्वर । त्यांचा वर्णिता नये पार । जड मूढ तारावया उपकार । तिही ग्रंथ केला ॥9॥ अ. सतरा ॥ परमेश्वराचे गुणगान किती गायले तरी त्यांचे उपकार फिटणार नाहीत म्हणून या जड, मुढ उध्दारण्यासाठीच हा योगसंग्राम ग्रंथ केला असे शेख महंमद महाराज सांगतात. यामध्ये त्यांनी बहुजन समाजातील संतांनी हीन याती कुळात जन्म घेऊन सुद्धा पवित्र असे ज्ञानदानाचे काम केले याचा उल्लेख केलेला आहे चोखामेळा रोहिदास चांभार । शिंपी नामा मोमीन कबीर । पिंगळा गणीका वाल्हा तस्कर। कोळी होता ॥13॥अध्याय 18॥ हे परमेश्वर भक्ती करण्याचा अधिकार कोणत्याही एका वर्गाला नसून तो सर्व मानवजातील आहे व समान आहे हा समभाव शेख महंमद महाराजांनी निक्षून सांगितला आहे. मी मुसलमान आहे म्हणून मला छळु नका कारण माणसाची श्रेष्ठता ही त्याच्या जाती कुळावरुन न ठरवता त्याच्या कर्मावरुन ठरवली जाते. अनेक ठिकाणी भाविकांना तत्कालीन परिस्थितीशी मिळते जुळते दृष्टांत दिलेले आहेत. पुराणातील काही प्रसंग, रामायण, महाभारत, गीता आदींवरील उदाहरणे देऊन श्रोत्यांना विषय समजावून सांगीतले आहेत.
अग्न टाकून आपल्या घरावरी । तातडीने खाणो धावे विहिरी । तैसा मृत्युकाळी ह्मणे हरि हरि । हरी कैसेनि पावेल ॥93॥ तरूणपणी करी विषयधंदा । वार्धक्यी ह्मणे पाव गोविंदा । तो तो श्रीहरी पातती द्वंद्वा । यमास चिथाऊनिया ॥94 ॥ अ. 9 वा॥ एक म्हण आहे तहान लागली की विहीर खोदण्याची आठवण येते त्या प्रमाणे शेख महंमद महाराज सोपा दृष्टांत देतात, आपल्या घरावर अगीचा गोळा फेकुन लगेच ताबडतोब विहीर खोदायला सुरुवात करतो मग विहीरीला पाणी लागेपर्यंत घराचा पार कोळसा होईल ना? त्याप्रमाणे विषयलंपट माणसे आयुष्यभर कधी कोणाच्या कामाला येत नाहीत की परमार्थ करत नाहीत आणि मृत्युसमयी मात्र परमेश्वरा मला पाव असा धावा करतात जसा परमेश्वर तुझ्यासाठी लगेच येवून तुला वाचवेल. म्हणून माणसाने जीवन जगत असतांना परमेश्वराचे नामचिंतन केले पाहिजे, सत्कर्म केले पाहिजे हाच उपदेश महाराज योगसंग्रामच्या माध्यमातून जड जीवाला अगदी सोपे दृष्टांत देऊन सांगतात.
सध्या मुलींची संख्या कमी असल्याने मुलीच्या आई वडिलांना खुप भाव चढला आहे म्हणून मुलीचे आई वडील मुलगी देऊन मुलाच्या वडीलांकडून भरमसाठ पैशाची मागणी करत आहेत. हीच वास्तवता महाराजांनी 450 वर्षापूर्वी सांगीतली होती बिजवरास कन्या देऊन द्रव्य घेती । ते प्रत्यक्ष बोक्याचा देह धारिती । खाटिक पारधी कसबा होती । ते सुरापाणी ओळखावे ॥64॥ अ.11॥ या घटनेतून शेख महंमद महाराजांचे सुक्ष्म निरीक्षण व दुर दृष्टी लक्षात येते.
हरी आणि अल्लाच्या नावाने समाजात तेढ निर्माण करणार्या धर्मठकांना शेख महंमद महाराज सांगतात आता अल्ला ह्मणा वो तुह्मी वाचे । हरी ह्मणता तुमचे काय वेचे । हरी अल्ला न ह्मणतील ते काचे । अघोरी जाणावे ॥94॥ ऐका हरी अल्ला जरी दोन असते । तरी ते भांडभांडोच मरते । वोळखा काही ठाव उरो न देते । येरून येराचा पै ॥95॥ अ.11॥ मराठ्यांनो तुम्ही अल्ला म्हणा अल्ला म्हणल्याने काय जाते काय अन् मुसलमानाने हरी म्हणल्याने मुसलमानाचे काय नुकसान होते काय हे दोन वेगळे नसून एकच आहेत. सध्या मात्र अल्ला आणि हरीच्या नावाचे भांडवल करुन तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र काही समाजकंटक करत आहेत त्यांनी हा योगसंग्राम वाचावा जेणेकरुन त्यांची डोकी ठिकाणावर येतील.
परमेश्वराची वरपांगी भक्ती करणारे लोक समाजात खुप आहेत ते आपल्या सोईने परमार्थ करतात त्यांच्यासाठी संत शेख महंमद महाराज म्हणतात सोने रूपे प्रत्यक्ष ह्मणती देव । ते घडोेन पूजी ठेवून तिचे नाव । दुष्काळ पडल्या ह्मणती मोडून खावे । सुकाळी मागुती घडू ॥61॥ अ.12॥ असे लोक सोन्याच्या, रुप्याच्या मुर्ती तयार करुन त्यांची भक्ती करतात. दुष्काळ पडल्यावर मात्र त्या मोडून त्याचे पैसे करतात व आपली गरज भागवतात. त्यांना देव का मोडले असे विचारले असता ते म्हणतात सध्या दुष्काळ पडल्यामुळे देव मोडले आहेत सुकाळ आल्यावर परत देव घडवू व देवाची पुजा करु असे हंगामी भक्त काय कामाचे, असा सवाल महाराज करतात.
नवस सायास केल्याने मुलं होत असती तर नवरा करायची काय गरज आहे असे तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात त्याच प्रमाणे शेख महंमद महाराज म्हणतात नवस केलीया जरी पुत्र जाले । व्याघ्र सिंह नवसेविण जन्मले । चौर्यांशीचे दु:ख सुखसोहळे । जाले नवस केलियाविण ॥90॥ अ.12॥ नवस केल्याने जर मुलं होत असतील तर जंगलातील वाघ,सिंह आदी प्राण्यांना पिलं होण्यासाठी कोणी नवस केले होते. ते तर विना नवसाचेच झाले म्हणून कर्मकांडात अडकु नका नवस सायास न करता आपले कर्तव्य, कर्म निट करा हाच संदेश महाराज देतात. काही मुर्ख लोक नवस करुन देवाला धनधान्य संपत्ती मागतात मात्र देवाला नवस करुन जर धनधान्य संपत्ती देता आली किंवा त्यांच्यामध्ये जर ऐवढे सामर्थ्य होते तर रावणाच्या लंकेत बंदीखाने सोसण्याची वेळ आली असती काय? असा खडा सवाल संत शेख महंमद महाराज विचारतात मूर्ख नवस करून देवतांप्रती । ह्मणे आह्मा द्यावी धनधान्यसंपत्ती । ऐसेच मूर्ख वेळोवेळ बोलती । उग्र व्रत धरूनिया ॥80॥ या देवतांच्याने सुख लागे भोगणे । तरी त्यांनी का सोसिले बंदीखाने । देवपण सामर्थ्य कोठे गेले नेणे । रावणाचे सत्तेपुढे ॥81॥ अ.12॥
संत शिरोमणी शेख महंमद महाराजांनी स्व:हस्ते लिहीलेला योगसंग्राम श्रीक्षेत्र वाहिरा भूमीत सार्थ झाला, याचा मला आनंद वाटतो. योगसंग्राम वाचायचा तो फक्त काही लोकांनीच कारण त्याचा अर्थच समजत नाही. ही समज आता बदलुन योगसंग्राम आता ज्याला पुस्तक वाचायला येतं तोही वाचु शकेल व समजु शकेल इतका सोपा अन् सुट सुटीत केला आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात फोडीले भांडार धन्याचा हा माल । मी तो हमाल भार वाही ॥ या न्यायाने संत शिरोमणी शेख महंमद महाराजांनी मला (हमालाला) जे सांगितले होते की, या समाजापर्यंत हे साहित्य घेऊन जा. या योगसंग्राम मध्ये काय आहे ते सोपं करुन सांग ते मी केलं केलं आहे. हा ज्ञानामृताचा ठेवा आपल्यापर्यंत आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. हा अमुल्य ठेवा आपण स्विकाराल, स्वागत कराल अशी अपेक्षा.
योगसंग्राम ग्रंथातील विचार अनुकरणीय
शेख महंमद म्हणे जी ऋषीकेशी। आणिक एक विनंती तुम्हांशी । जे कोणी ऐकतील या ग्रंथासी। ते समूळी उध्दरावे ॥60॥ अ.3॥ संत शेख महंमद महाराज या ओवीच्या माध्यमातून सांगतात जे भक्त, वारकरी, श्रोते या ग्रंथाचे वाचन, मनन, श्रवण करतील, त्याप्रमाणे अनुकरण करतील तर त्यांचा स्वत:चा तर उध्दार होईलच पण कुळाचाही उध्दार होईल. पाप ताप नाहीशे होतील, घरामध्ये ग्रंथ ठेवल्यास कोणत्याही प्रकाचे दोष राहणार नाहीत. म्हणून प्रत्येकाच्या घरात “योगसंग्राम” ग्रंथ ठेवावा व आपल्या कुटूंबाचा उध्दार करुन घ्यावा असे महाराज म्हणतात.
लेखक
ह.भ.प. सिध्दीनाथ मेटे महाराज
अध्यक्ष, श्री संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठाण
श्रीक्षेत्र वाहिरा, ता.आष्टी, जि.बीड
COMMENTS