नगर तालुका पंचायत समितीत लवकरच नव्या कारभाऱ्यांची निवड होणार आहे. नुकतेच नगर तालुका पंचायत समितीच्या सभापती कांताबाई कोकाटे व उपसभापति रवी...
नगर तालुका पंचायत समितीत लवकरच नव्या कारभाऱ्यांची निवड होणार आहे. नुकतेच नगर तालुका पंचायत समितीच्या सभापती कांताबाई कोकाटे व उपसभापति रवी भापकर यांनी पदाचा राजीनामा पक्ष श्रेष्ठींकडे दिला आहे.
नगर तालुका पंचायत समितीत शिवसेना-काँग्रेस यांची महाआघाडी आहे. गत पदाधिकारी निवड करताना प्रमुख नेत्यांची डोकेदुखी झाली होती. समन्वयातून पुढच्या सव्वा वर्षात राजीनामे देण्याचा शब्द दिल्यावर या निवडी अंतिम झाल्या होती. कोकाटे आणि भापकर यांनी दिला शब्द पाळत राजीनामे दिले. त्यामुळे तालुक्यात नवीन पदाधिकारी निवडीबाबत उत्सुकता वाढली आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, जि. प. चे उपाध्यक्ष प्रताप शेळके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, माजी सभापती संदेश कार्ले व बाळासाहेब हराळ यांच्या बैठकीत हा सव्वा-सव्वा वर्षांचा फॉम्युला ठरला होता. त्यानुसार सभापती, उपसभापती यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे राजीनामे सुपूर्त केले आहेत.
सभापतीपद महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे सुरेखा गुंड यांची सभापतीपदी वर्णी लागेल, हे जवळपास निश्चित मानले जाते. तर उपसभापती पदासाठी डॉ. दिलीप पवार यांनी दावा केला आहे.
गाडेंच्या भूमिकेकडे लक्ष...
नव्या पदाधिकारी निवडीदरम्यान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांची भूमिका महत्वाची असणार आहे. त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.
COMMENTS