माध्यमांची हुकुमत ; आपल्या हालचाली आणि दैनंदिन घडामोडींवर पाळत... संपूर्ण जग कोरोना संक्रमनामुळे लॉकडाऊन झालेलं आहे. ह्या काळात संपूर्ण जग...
माध्यमांची हुकुमत ; आपल्या हालचाली आणि दैनंदिन घडामोडींवर पाळत...
संपूर्ण जग कोरोना संक्रमनामुळे लॉकडाऊन झालेलं आहे. ह्या काळात संपूर्ण जग एकप्रकारे आपआपल्या घरात कोंडल गेलेलं आहे. ह्या संकटाच सावट डोक्यावर असतानाच आता घरात थांबून नेमकं करायचं काय, हाही प्रश्न विश्वातील बहुतांशी लोकांना पडला होता. ह्या संकटाच्या काळी लोकांच्या मदतीला धाऊन आलं ते इंटरनेट. मग ते फेसबुक, व्हाट्सअप्प, इन्स्टाग्राम असो किंवा युट्युब ह्या संकटाच्या काळात लोकांचा वेळ मार्गी लावत होतं. या दरम्यान केल्या गेलेल्या विविध सर्व्हेनुसार शहरी भागात ५४ % म्हणजे प्रत्येक दुसरा व्यक्ती हा इंटरनेट वापर करू लागला आहे. ग्रामीण भागातील हे प्रमाण जवळपास ४०% च्या आसपास आहे. एकूण विचार केला गेला तर पूर्वीपेक्षा जवळपास सरासरी १० ते १५ % नवीन वापरकर्ते ह्या काळात इंटरनेटशी जोडले गेले. इंटरनेट सर्वदूर पोहोचलं ह्याद्वारे लोकांचा वेळ मार्गी लागला असेही म्हणता येईल. परंतु, इंटरनेटचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. एडवर्ड टर्फे नावाचा तत्वज्ञ म्हणतो, ‘जगातील दोनच गोष्टीच्या ग्राहकांना ग्राहक न म्हणता वापरकर्ते म्हटले जाते. एक म्हणजे अवैध ड्रगजचे ग्राहक आणि दुसरे म्हणजे सॉफ्टवेअर वापरकर्ते. म्हणजे एकप्रकारे तुमच्यासाठी जरी सोशल मिडिया हा वेळ घालवण्यासाठीच माध्यम असले तरी सोशल मीडिया कंपन्यासाठी तुम्ही एक युजर असतात. ज्यांना तुमच्या मानसिकतेला ओळखून तुम्हाला त्यांच्यासोबत खिळवून ठेवायचं असते. ह्याच माध्यमातून मग तुमच्या मतांचे ध्रुवीकरण करणं, तुमचे मतपरिवर्तन घडवुन आणणं या गोष्टी मोठ्या प्रमाणावर होत आहेत. ह्याद्वारे मोठ्या प्रमाणावर मानसिकतेवर आघात होतच आहेत. सोबतच सामाजिक स्वास्थही बिघडण्यात हातभार लावला जातो आहे. प्रगत देशांमध्ये ह्या समस्या प्रकर्षाने जाणवू लागल्या आहेत. भारतासारख्या देशात जिथे इंटरनेट साक्षरतेचा अभाव प्रचंड प्रमाणात सामाजिक ध्रुवीकरण आहे, त्या देशात इंटरनेटच वाढत प्रमाण आणि त्यातून इच्छित घटना घडवून आणणे (manipulation) ह्यामुळे अधिकच चिंता वाढवणार असे आहे. भविष्यात ह्यामुळे देशापुढे मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होण्याची शक्यता ह्यातून व्यक्त होत आहेत.
सोशलमीडियाचा राजकारणात दबदबा
सोशलमाध्यम ही लोकांना एकमेकांशी जोडून संबंध दृढ करण्यासाठी आहे, असं नेहमी म्हटलं जाते. परंतु, गेल्या काही वर्षातील घटना पाहिल्या तर ह्या माध्यमांचा वापर हा संबंध दृढ करण्यापेक्षा राजकीय हित साधण्यासाठी केला जातोय, हे समोर येतंय. अगदी ताजे उदाहरण द्यायचे झाल्यास ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ ह्या दैनिकामध्ये भारतीय राजकीय पक्ष आणि फेसबुकची हेट स्पीच संदर्भात असणारी नियमावली ह्या दोन्हीमध्ये फेसबुक एका विशिष्ट राजकिय पक्षासाठी हेट स्पीच नियमावली सोबत प्रतारणा करत असल्याचे केले गेलेले आरोप लक्षात घेणे महत्वाचे ठरते. भारताचा विचार केला तर सोशल मीडिया वापरणाऱ्या लोकांपैकी ८०% लोक फेसबुकचे वापरकर्ते आहेत. त्यामुळे फेसबुकवरचे हे आरोप खरतर मोठया गांभीर्याने विचार करायला लावणारे आहेत. ह्या आरोपांमध्ये म्हटलं गेलं होतं की, ‘भारतातील फेसबुकच्या प्रमुख असणाऱ्या अंखी दास ह्या भारतीय जनता पक्षाच्या बाजूने पक्षपाती आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या द्वेष पसरविणाऱ्या पेजकडे दुर्लक्ष केलं. ह्यावर फेसबुकने ह्या आरोपांचे खंडन केले. परंतु, फेसबुक ह्या माध्यमांबद्दल त्यांच्या वापराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करून जात आहे. फेसबुकच्या कृती शंकास्पद आहेत, हे नक्की.
फेसबुक या माध्यमावर मतांच्या ध्रुवीकरणाचे आरोप नवे नाहीत. ह्यापुर्वीही केंब्रिज अनलिटीका या कंपनीने फेसबुकच्या वापरकर्त्यांची माहिती चोरी करून विविध राजकीय पक्षांना विकत असल्याचे आरोप केले आहेत. ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाने काँग्रेस पक्ष ह्या कंपनीची सेवा घेत असल्याचे आरोप केलेले आहेत.
२०१६ साली झालेल्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत फेसबुकवर मतांच्या धृवीकरणाचा आरोप करण्यात आला होता. फेसबुकने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी रशियाच्या मदतीने मोठया प्रमाणात मतांच्या ध्रुवीकरणात मदत केली, हा मुख्य आरोप त्यामध्ये होता. माहिती चोरी आणि राजकीय ध्रुवीकरण ह्यामुळे फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना अमेरिकेन सिनेटर समोर बोलावण्यात देखील आले होते.
नेमकं ध्रुवीकरण होतं कसं ?
सोशल माध्यम आणि त्यातून होणार ध्रुवीकरण ह्यावर भाष्य करणार नेटफलिक्सवरचा ‘द सोशल डायलेमा’ ही डॉक्युमेंट्री सध्या चर्चेत आहे. ह्यामध्ये विविध सोशल माध्यमात काम केलेल्या लोकांनी ही माध्यम नेमकी कशी काम करतात, कसे तुमचे मत वळविण्यात येते, ह्यावर भाष्य केलेलं आहे. सामाजिक, राजकीय आणि वैयक्तीक गोष्टींवर ही जी सोशल मिडिया माध्यम कशी प्रभावी ठरतात हेही सांगितलेलं आहे. जाणकारांनी माहितीपट नक्की पाहावा. म्हणजे फेसबुकसारख्या समाजामाध्य्मांची व्याप्ती लक्षात येईल.
• फेक खाती-
सोशल मीडियावर ध्रुवीकरणासाठी सर्वाधिक वापर जर कुठल्या गोष्टींचा केला जात असेल तर तो म्हणजे फेक खात्यांचा. ह्यामध्ये निरनिराळे खाते बनवली जातात. ह्या खात्यांच्या माध्यमातून खोटी माहिती पसरवली जाते. एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलीन करण्यासाठी वारंवार ट्रेंडच्या माध्यमातून, ह्या खात्यांच्या माध्यमातून खोट्या गोष्टी समोर ठेवल्या जातात. वारंवार होणाऱ्या ह्या माऱ्यामुळे आणि सत्यता न तपासल्यामुळे, घटना अथवा माहितीची सत्यता न तपासता तिचा जोरदार प्रसार होतो.
• सोशल माध्यमांचा अल्गोरिदम
सोशल माध्यमात लोक कनेक्ट राहण्यासाठी अल्गोरिथम हा मुख्य घटक कारणीभूत असतो. विविध ट्रेंड किंवा वापरणाऱ्याची मनोविज्ञानानुसार त्याला नवीन गोष्टी सुचवण्याच काम अल्गोरिथम करत. लोक अधिकाधिक वेळ सोशल माध्यमांवर खिळवून रहावे हा ह्या पाठीमागचा मुख्य हेतू असतो. हा घटक मोठ्याप्रमाणात व्यक्तीच्या मानसिकतेशी निगडित असल्याने ह्याचा मोठा परिणाम होतो, म्हणूनच ह्या घटकाचा मोठ्या प्रमाणावर मतांचे किंवा विचारांच्या ध्रुवीकरणासाठी केला जातो.
• सोशल माध्यमांमध्ये खोटी माहिती तपासणारी कमकुवत यंत्रणा
अमेरिकेच्या सिनेट मध्ये जेव्हा फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना माहिती चोरी आणि इतर बाबींसाठी बोलावण्यात आलेले होत, तेव्हा त्यांनी आपल्या उत्तरात म्हटलेलं होत की, सोशल माध्यम ही सर्वदूर पसरलेली आहेत. त्यामुळे जगातील विविध भाषा यामध्ये वापरल्या जातात, ह्या सर्वांची सत्यता पडताळून पाहणारी यंत्रणा उभी करणे अशक्यप्रय अशी गोष्ट आहे. सत्यता पडताळण्याचे प्रयत्न नेहमी अपुरे पडतात. सोशल माध्यमांची हीच कमतरता मतांच्या ध्रुवीकरणामध्ये मदतगार ठरते.
• समाज माध्यमांच जडलेलं व्यसन
समाज माध्यम ही व्यसनासारखी बनली आहेत. माध्यमांच्या ह्या व्यसनामुळे आणि त्यात आपणही मागे राहू नये ह्या हव्यासापोटी बरेचदा खोटी माहिती पसरवण्याचे प्रकार केले जातात. जेवढी जास्त वादग्रस्त पोस्ट तेवढी जास्त चर्चा हे समाजमाध्यमांच अल्गोरिथम बरेचदा सद्सद्विवेक बुद्धी हरवण्यास कारणीभूत ठरते, मग खोटी माहिती पसरवली जाते.
समाजमाध्यमांकरवी होणार ध्रुवीकरण कस थांबवावं?
• सोशल माध्यमांमध्ये असणारी खाती कायमचे बंद करावी
२०१७ मध्ये जेव्हा डाटा चोरीच्या बातम्या चर्चेत होत्या, तेव्हा अमेरिकेत लाखो लोकांनी फेसबुक खाती कायमची बंद केल्याची माहितीसमोर आली होती. अमेरिकेतील काही लाख लोकांनी हे केलेलं असले तरी, सोशल माध्यमांचे लागलेले व्यसन ह्यामुळे हे किती लोकांना शक्य होईल ही शंका आहे. परंतु, किमान ह्याद्वारे सोशल माध्यमांसाठी ठराविक कालावधी ठरवुन त्याप्रमाणे वापर करावा. गरजेचे नसलेले समाजमाध्यम मोबाईलमधून काढून टाकावे.
• समाज माध्यम वापरताना त्या माध्यमाने सुचवलेले (recommended) व्हिडीओ पाहणं टाळावं
सुचवलेले व्हिडीओ हे तुम्हाला स्वतःच मत बदलायला भाग पाडतात, या प्रक्रियेत महत्वाचा हातभार लावतात. समाज माध्यम वापरताना त्यामुळेच नवीन काहीतरी पाहताना सुचवलेले व्हिडिओ न पाहता नव्याने शोधून व्हिडीओ पहावेत. त्या माध्यमाला तुम्हाला काय दाखवायचंय याहीपेक्षा तुम्हाला काय पहायचय ह्याला प्राधान्यक्रम द्या.
• सत्यता पडताळा
समाज माध्यमांमध्ये कुठलीही गोष्ट शेअर करताना किंवा एखादया गोष्टींवर व्यक्त होताना त्या गोष्टींची सत्यता पडताळून पाहणे, खूप महत्वाचे आहे. कोणत्याही मजकुराची सत्यता पडताळण्याची कमतरता, मोठ्या प्रमाणावर खोट्या गोष्टी पसरवण्यास मदत करते. ज्यातून सामाजिक स्थिती बिघडण्यात येते, त्यामुळे कुठल्याही गोष्टीवर व्यक्त होताना, त्याची सत्यता पडताळून पाहिली पाहिजे. मग त्यावर मत व्यक्त केलं पाहिजे.
• समाजमाध्यमांमध्ये असणार नोटिफिकेशनच बटन बंद करा
समाजमाध्यमांच व्यसन जडण्याच खर कारण कुठेतरी ह्या नोटिफिकेशनमध्ये दडलेले आहे. तुम्ही कुठली तरी गोष्ट पोस्ट केली किंवा व्यक्त झालात, त्याचे येणारे नोटिफिकेशन हे तुम्हाला त्या माध्यमाचे व्यसन लावण्यास कारणीभूत ठरतात. ह्या नोटिफिकेशनपासून जेवढे तुम्ही दूर रहाल तितकेच तुम्हाला समाज माध्यमांच व्यसन हे कमी प्रमाणात असेल.
श्री. राहुल ठाणगे
( लेखक हे समाज माध्यमांचे जाणकार व अभ्यासक आहेत. )
COMMENTS