प्रतिनिधी : सासू सुनेचे वादाचे अनेक प्रकार घडतात. या घटना आपल्याला नवीन नाहीत. सासरच्या मंडळींकडून सुनेच्या छळाच्या घटना राजरोसपणे घडतात. मा...
प्रतिनिधी : सासू सुनेचे वादाचे अनेक प्रकार घडतात. या घटना आपल्याला नवीन नाहीत. सासरच्या मंडळींकडून सुनेच्या छळाच्या घटना राजरोसपणे घडतात. माहेरची साडी या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी साकारलेली ‘सासू’ हे पात्र आपल्या आजूबाजूला नेहमी अनुभवायला मिळते. मात्र, रा. चनई, ता. अंबाजोगाई येथे राहणाऱ्या सासूचा तिच्या सुनेकडून छळ केल्याचा प्रकार घडला आहे. या सुनेच्या त्रासाला वैतागून या ज्येष्ठ महिलेच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
भागीरथीबाई बाबूराव वाडेकर असे पिडीत महिलेचे नाव आहे. त्या सत्तर वर्षांच्या आहेत. त्या अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी होत्या. आपल्या स्व कमाईने चनई, ता. अंबाजोगाई येथे त्यांनी प्लॉट विकत घेऊन घराचे बांधकाम केले. दरम्यान त्यांनी ‘अविनाश’ या मुलाला दत्तक घेतले. त्याचा विवाह स्वातीशी झाला. सून स्वाती हिने लग्नानंतर नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केले. याकाळात तीन नातवांचा सांभाळ भागिरथीबाई यांनी केला. काही दिवसांपूर्वी अविनाशचा अपघाती मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूपश्चात स्वातीच्या वागण्या-बोलण्यात बदल झाला. स्वातीने तीची बहिण ज्योती अनिल निलंगे हिच्या मदतीने भागिरथीबाई यांना त्रास देण्यास सुरुवात केली.
अंबाजोगाई येथील ज्येष्ठ नागरिक संघाने वाडेकर यांना मदतीचा हात देऊन पाठबळ दिले. त्याच्या मदतीने भागीरथीबाई बाबूराव वाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ‘सुनेने बहिणीच्या मदतीने मानसिक आणि शारीरिक छळ केला. पेन्शन न दिल्याने उपाशी ठेवले.’ सदर फिर्यादीवरून सून स्वाती वाडेकर आणि तीची बहिण ज्योती अनिल निलंगे यांच्यावर ज्येष्ठर नागरिक आणि पालक यांचे पालनपोषण आणि कल्याण अधिनियमान्वये अंबाजोगाईत गुन्हा दाखल झाला.
COMMENTS