कोल्हापूर : प्रेम म्हणजे प्रेम असते, म्हणजे नेमकं काय असते, हे प्रकरण नक्की काय असते, हे ठामपणे कोणीही सांगू शकत नाही. प्रेम या भावनेला अन...
कोल्हापूर :
प्रेम म्हणजे प्रेम असते, म्हणजे नेमकं काय असते, हे प्रकरण नक्की काय असते, हे ठामपणे कोणीही सांगू शकत नाही. प्रेम या भावनेला अनेक पदर आणि कंगोरे असतात. प्रत्येकाला प्रेयसी किंवा प्रियकर हवा असतो. या भावनेने माणूस पछाडला जातो. त्याचे किंवा तिचे प्रेम मिळवण्यासाठी मग माणूस धडपड करू लागतो. हे प्रेम आपलंस करताना तो कोणत्या थराला जाऊ शकतो याची आपण कल्पनाही करू शकत नाही. असा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील धरणगुत्ती या गावात घडला असून एका प्रेमवीराने प्रेयसीची आठवण येते म्हणून तब्बल अडीच किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यावर ‘आय मिस यू,’ ‘आय लव्ह यू’ असे संदेश लिहिले आहेत.
दरम्यान या संदेशात कुठेही प्रेमवीराने प्रेयसीचे नाव लिहले नाही. किंवा त्याची ओळख उघड होईल, असा मजकूर आढळून आला नाही. म्हणून या प्रेमी युगालाची ओळख पटली नसली तरी त्याची जोरदार चर्चा कोल्हापूरसह राज्यात आहे. सोशल मिडीयावर हे फोटो व्हायरल झाले आहेत.
रस्त्यावर लिहलेले हे संदेश पुसून टाकण्यासाठी ग्रामपंचायतला ऑईल पेंट मारावा लागला आहे. जयसिंगपूर ते धरणगुत्ती रस्त्यावर अडीच किलोमीटरपर्यंत लिहलेले हे संदेश मिटवण्यासाठी पेंट आणि मजुरीचा खर्चही ग्रामपंचायतीला करावा लागला आहे. प्रेमवीराने असला उद्योग केल्याने धरणगुत्ती ग्रामपंचायतीला मोठा ताप आला आहे.
हे काम रात्रीच्या वेळी करण्यात आले असून किमान चार जणांच्या टोळीने पूर्ण केले असावे, असा प्राथमिक अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
यापूर्वी असाच प्रकार चर्चेत...
प्रेयसीची माफी मागण्यासाठी पुण्यात शिवडे “आय अॅम सॉरी’ या आशयाचे तब्बल ३०० फलक महामार्गावर लावण्यात आले होते. तो प्रियकर आज ही सर्वांच्या आठवणीत आहे. त्यानंतर कोल्हापूर येथील ‘या’ प्रियकराने प्रेयसीला इंप्रेस करण्यासाठी नामी शक्कल लढविल्याने हे प्रेमी युगल चर्चेत आहे.
COMMENTS