अहमदनगर : मोजक्या मतदानामध्ये दहशतीच्या जोरावर माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी नगर तालुका बाजार समिती आणि जिल्हा सहकारी बँकेमध्ये यश मिळव...
अहमदनगर :
मोजक्या मतदानामध्ये दहशतीच्या जोरावर माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी नगर तालुका बाजार समिती आणि जिल्हा सहकारी बँकेमध्ये यश मिळवले. मात्र, सर्वसामान्य मतदार हा महाविकास आघाडी सोबत असल्याने १५ वर्षांपासून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये त्यांना यश मिळाले नसल्याची घणाघाती टीका शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी केली आहे. आता गाडे यांना कर्डिले हे त्यांच्या खास स्टाईलने कसे प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
पंचायत समितीच्या सभापतिपदी सुरेखा गुंड आणि उपसभापतिपदी डॉ. दिलीप पवार यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर आयोजित सत्कार कार्यक्रमात गाडे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, शरद झोडगे, माजी सभापती रामदास भोर, कांताबाई कोकाटे, पंचायत समिती सदस्य गुलाब शिंदे, व्ही. डी. काळे, मंगल आव्हाड, माजी उपसभापती रवींद्र भापकर आदी उपस्थित होते.
गाडे म्हणाले की, साखर सम्राटांवर बोलून कर्डिले सहानुभूती मिळवत आहेत. त्यांच्या बाणेश्वर दूध संघाला तब्बल २ कोटी रुपये कर्ज कोणत्या नियमात मिळाले होते, याचे उत्तर मग त्यांनी द्यावे की. त्या कर्जासाठी त्यांनी काय तारण ठेवले? कर्ज घेतलेले पैसे कोणत्या कामासाठी आणि ठिकाणी वापरले? याची चौकशी झाली पाहिजे.
महाविकास आघाडीमध्ये फुट पडणार असल्याच्या अफवा होत्या. त्यावर बोलताना गाडे म्हणाले की, भाजपने आमच्या काही सदस्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. महाघाडीचे ३ सदस्य फुटले, अशा अफवा पसरवल्या. प्रत्यक्षात आमचे कोणी फुटणारे नव्हते. उलट भाजपचेच २ सदस्य आमच्या संपर्कात होते.
कर्डिले यांच्या ताब्यातील बाजार समितीवर भ्रष्टाचाराचे आरोपच आरोप आहेत. बाजार समितीत जागा विकून संपल्या की पूर्ण बाजार समितीच विक्रीला काढली जाईल. त्यांच्याच ताब्यातील तालुका दूध संघाची जागा विकली. त्यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. त्याचवेळी महाविकास आघाडीच्या पंचायत समितीच्या १५ वर्षे काळात एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, असा दावाही गाडे यांनी केला आहे
COMMENTS