संत शेख महंमद महाराज पुण्यतिथीनिमित्त लेखमाला तो काळ सोळाव्या शतकाचा. त्यावेळी महाराष्ट्रासह भारतभर वेगवेगळ्या संस्थांनीकांची राज्ये होती....
संत शेख महंमद महाराज पुण्यतिथीनिमित्त लेखमाला
तो काळ सोळाव्या शतकाचा. त्यावेळी महाराष्ट्रासह भारतभर वेगवेगळ्या संस्थांनीकांची राज्ये होती. मराठवाड्यात प्रस्थापीत निजामशाही, आदिलशाहीची पाळंमुळं घट्ट रोवली होती.
वाहिरा गावचा इतिहास तसा सुवर्णअक्षरांनी लिहीवा असा आहे. गावाला संपूर्ण दगडी तटबंदी (गावकुस) होती. गावच्या उत्तरेस मारुती मंदिरा समोर आणि दक्षिणेस बहिरोबा मंदिरा समोर अशी दोन प्रमुख प्रवेशद्वारे (येस) होती. मारुती मंदिरा समोरील प्रवेशद्वारा शेजारी भक्कम बुरुंज होती, तर दक्षिणेच्या प्रवेशद्वारा च्या बाजूला एक मोठी गढी होती. या गढी चा उपयोग परकीय आक्रमनां पासून बचाव करण्यासाठी होत असे. गावकर्यांना त्या गढीत स्वसंरक्षना साठी बसण्याची व्यवस्था होती. गावात वेगवेगळी अलुतेदार, बलुतेदार ,गावचे वेगवेगळी पाटील मंडळी आणि इतर गावकरी राहत असत.
वाहिरा गाव हे कदाचित एकमेव गाव असेल तेथे महार समाजाची व इतर मागास प्रवर्गातील समजाची वस्ती गावात गाकुसच्या आत होती. इतर गावात हा समाज गावकुसाबाहेर असायचा. म्हणून मला वाहिरा गावातील इतिहासाच्या मुळाशी जाणे गरजेचे वाटले .संत शेख महंमद महाराज हे नाथ कालीन संत होते. त्यांनी तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर प्रहार केले, परंतु जनजीवनातील दृढ विश्वास,परंपरा आणि पक्क्या धारणा मुळे या संताकडेच नव्हे तर सर्वच पुरोगामी विचारवंताकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. येथे सर्वाना माहीत असलेली संत शिरोमणी एकनाथ महाराजांची ही एक सर्वश्रुत कथा मी पुन्हा आपणासमोर मांडतो, त्या अनुषंगाने आपण विचार करू...
संतश्रेष्ठ एकनाथ महाराज पैठण येथे गंगास्नानासाठी नेहमीप्रमाणे निघाले होते. वातावरण सूर्याच्या उष्ण किरणांनी तप्त झाले होते. नामस्मरणात लीन असलेले महाराज गंगा तीरावर मार्गक्रमण करत असताना अचानक त्यांच्या दृष्टीस एक चिमुकले मूल तापलेल्या वाळूत धडपडताना दिसले. त्यांनी इकडे तिकडे पाहिले असता त्याची आई - महार समाजाची एक भगिनी पाणी भरण्यास पुढे गेली असता पाठी मागून येणार्या त्या मुलाची तिला कल्पना नव्हती. तप्त उन्हामुळे वाळूचे चटके त्या चिमुकल्याला बसत होते. त्याची अवस्था बिकट झाली होती, रडून रडून त्या मुलाने आक्रोश मांडला होता. नाथांना ते पहावले नाही. त्यांचे मन हेलावले, तातडीने त्या मुलापाशी जाऊन त्यास उचलून घेतले. त्याला आपल्या हृदयाशी कवटाळले, आपल्या वस्त्रांनी त्याचा चेहरा पुसला आणि महारवाड्यात पोहचवले.
एका महार जातीच्या मुलाला अगदी आपलेपणाने घरी आणल्याचे पाहून अर्थातच महारवाड्यातील मंडळी, मुलाचे आई वडील आश्चर्यचकित झाले. आई- वडिलांना अगदी गदगदून आले. संत एकनाथ महाराज हे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण होते.
या घटनेनंतर च्या काळात अनेक घडामोडी होत गेल्या. तत्कालीन सामाजिक परिस्थितीनुसार तथाकथित कट्टर चातुर्वर्ण्य व्यवस्थेनुसार प्रस्थापितांना प्रामुख्याने ब्राह्मणांना या गोष्टीची चीड येणे स्वाभाविक होते. त्यांनी नाथांना छळण्यास सुरवात केली. महार वस्तीवर हल्ले केले. त्यांना बहिष्कृत करून सळो की पळो करून सोडले.
पैठणचे हे महार म्हणजेच पैठण पगारे होय, ही मंडळी आपली कुटुंबे ची कुटुंबे घेऊन नाशिक, धुळे-जळगाव, नगर-बीड असे विखुरली गेली. पुढील काळात त्यांनी वेगवेळे व्यवसाय करून त्याप्रणे उदरनिर्वाह करत राहिले आणि तेथेच स्थिरावले, तर काही वतनदार झाले. त्यांची व्यवसायानुरूप नावे अपभ्रंशीत झाली. उदा. फुलपगार, गोतपगार, मिरपगार, पैठण पगार, पगारे ... यापैकी वाहिरा गावात नाथांनी शेख महंमद महाराजांकडे एक कटुंब पाठविले. त्या काळी एक- एक बलुतेदार अशीच आश्रित व्हायची. शेख महंमद महाराज हे हाडाचे संत, त्याकाळातील संत परंपरेतील श्रेष्ठ संत तसेच राजाश्रय मिळालेले मुस्लिम संत म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी या पैठण पगारे कुटुंबास आपल्या वाहिरा गावातील बागेत आश्रय दिला. त्याकाळी सवर्ण वर्गाचा दलीत समाजाचा स्पर्श सुद्धा चालत नव्हता. गावकुसा बाहेर वस्ती असायची, महाराजांनी आपल्या फुलांच्या बागेत राहण्यास जागा देणे म्हणजे त्या काळातील ही एक फार फार मोठी ऐतिहासिक घटना होती. यातूनच महाराजांची महानता, मोठेपण आणि श्रेष्ठत्व सिद्ध होतं.
शेख महंमद महाराजांच्या नंतरच्या काळाचा मागोवा घेतल्यास, आज मितीस पगारे वस्तीतील उत्खननात बगीच्याच्या पाटाच्या पाण्याच्या मोठ मोठया शिळा सापडल्या. त्यातील काही शिळा ग्रामस्थांनी गावातील महादेव मंदिराच्या जीर्णोद्धारा साठी वापरल्यात. तसेच वस्तीत असलेली आणि आजमितीस संभाळलेली समाधी/मदार ही बाग काम करणार्या बाबांच्या मुस्लिम शिष्याची आहे. आणखी एक अशीच समाधी गावातील बारवाच्या खालच्या बाजूस त्याकाळात बाभळीत होती. एवढेच नाही तर बाबांच्या समाधी स्थळाच्या समोर उत्तरेला उजव्या कोपर्यात एक लिंबाचे झाड होते, त्याच्या पायथ्याशी एक समाधी होती. ती आमच्या पूर्वज पैठण पगारे या पूर्वज स्त्री ची आहे. आज ही उत्खननात सापडेल. शेख महंमद महाराजांनी तिला आपल्या चारणाशी स्थान दिलेले आहे. अगदी पूर्वी आमच्या समाजाची स्वतंत्र दिंडी भांडार्याच्या दिवशी टाळ मृदुंग वाजवत या ठिकाणी स्थिरावयाची. माझे वडील हे एक उत्कृष्ट मृदुंग वादक होते. आजही यात्रेला आम्ही याच ठिकाणी विसावतो. महाराजांचा संदल पूर्वी बाराबलुतेदारांच्या साक्षीने लागत असे, गावातील सर्व समावेशकता यातून दिसते, पुढे जाऊन पगारे चे एक कुटुंब पुंडी येथे तर एक वाहिरा येथे स्थिर स्थावर झाले. तशी नोंद जुन्या 7/12, आणि खासरापत्रात आढळते. तसेच जुने आडनाव पैठण पगारे याची नोंद सुध्दा आहे.
एकूनच खरा इतिहास माहीत असलेली मंडळी अशिक्षित होती, त्यांना लिहता वाचता येत नसे. शेख महंमद महाराजांचा इतिहास मागे पडण्याचे हे एक मोठे कारण असावे, तो पुढील पिढीस अवगत असावा, भारतभूमितील वाहिरा हे एक ऐतिहासिक, पवित्र स्थान तर आहेच शिवाय जन्माने मुस्लिम असून त्या काळातील कट्टर मुस्लिमशाहित हिंदुत्व जोपासणे किती कठीण असेल ? तेच ते जात-पात, उच्च-नीच, अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणारे, संत तुकोबांचे गुरू, त्यांना कीर्तनाचे धडे देणारे, योगसंग्राम, पवन विजय, निष्कलंक प्रबोध असे ज्ञात अज्ञात अनेक ग्रंथ संपदा लिहणारे महान संत शेख महमंद महाराज आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त शतशः प्रणाम.
लेखक : सुभाष पगारे
ब्रँच मॅनेजर, एल.आय.सी., मुंबई
COMMENTS