घरकुल कामांची पाहणी करतांना ग्रामसेविका प्रियंका भोर, तत्कालीन सरपंच उषा पानसंबळ, ग्रामपंचायत सदस्य कैलास लांडे, अंबादास शेळके, ज्येष्ठ नेते...
![]() |
घरकुल कामांची पाहणी करतांना ग्रामसेविका प्रियंका भोर, तत्कालीन सरपंच उषा पानसंबळ, ग्रामपंचायत सदस्य कैलास लांडे, अंबादास शेळके, ज्येष्ठ नेते सबाजी पानसंबळ. |
कर्जुने खारे या गावात लष्करी तळ अर्थात के. के. रेंज असल्याने देशभरात ओळखले जात आहे. पुन्हा हे गाव चर्चेत येत आहे. या गावाने आदिवासी जमातीतील भिल्ल कुटुंबियांना पक्का निवारा मिळावा, म्हणून शासनाच्या योजनांचा समन्वय साधून देशातील पहिला वाहिला ठरवा असा उपक्रम हाती घेतला आहे. काय आहे हा प्रकल्प, चला त्याविषयी जाणून घेऊयात.
कर्जुने खारे येथे ७० भिल्ल कुटुंबांसाठी घरकुल योजनेतून बांधकाम प्रगतीपथावर आहे. एकाच वेळी गावातील सर्वच आदिवासी कुटुंबाना एकत्रित लाभ देण्याची कदाचित ही स्वतंत्र भारतातील पहिलीच वेळ असेल. केंद्र सरकारच्या शबरी आवास योजना आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थ सहाय्य योजनेचा संगम साधत हे काम अंतिम टप्प्यावर पोहचले आहे. या कामासंदर्भात पुढाकार घेऊन, ते तडीस नेण्यासाठी प्रयत्नशील असणारे ग्रामपंचायत सदस्य कैलास लांडे यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
कैलास लांडे म्हणतात, आदिवासी जमातीत शिक्षणाचा अभाव, दारिद्र्य असल्याने त्यांचे जीवनमान अत्यंत कष्टाचे व हलाखीचे आहे. रोजच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना मोलमजुरी केल्याशिवाय तरणोपाय नाही. परिसरात के.के. रेंज असल्याने अनेक तरुण हद्दीत घुसून भंगार गोळा करण्यासाठी जातात. तसे तर हे गैरच. मात्र, तरीही ही मानसं अगदी जीवावर उदार होवून ही कामे करतात. ज्यावेळी युद्ध सराव सुरु असतो, अशा वेळी आत घुसलेल्या अनेक तरुणांनी जीव गमावला आहे. या घटना वारंवार घडल्या, मात्र हा समाज नेहमीच दुर्लक्षित राहिला. त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी त्यांच्या झोपडीवजा छपरातून त्यांना बाहेर काढणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन त्यांना घरकुल योजनेतून लाभ मिळवून देऊयात असे मनात आले.
त्यानुसार नियोजन करून संबधित अधिकाऱ्यांच्या भेटी गाठी घेतल्या. लाभ द्यायला कोणाचीही हरकत नाही, मात्र या आदिवासी समुदायाकडून कोणतीही आवश्यक कागदपत्रे सहजासहजी उपलब्ध होत नसल्याचा अधिकार्यांचा पूर्वाश्रमीचा अनुभव होता. त्यामुळे अनेकांनी या उद्योगात पडून उपयोग होणार नाही, असेच सुनावले. मग सर्व प्रथम सर्व लाभार्थींच्या याद्या केल्या. सर्वांचे प्राथमिक कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु झाली. तत्कालीन आमदार विजय औटी यांच्या सहकार्याने राजस्व अभियानांतर्गत रेशनकार्ड, आधार कार्ड, आणि बँक खाते उघडण्यासाठी मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात अनेकांना जातीचे दाखले, रेशनकार्ड आणि आधारकार्ड अशी महत्वाची कागदपत्रे सहज उपलब्ध झाली.
![]() |
भिल्ल समुदायाची जुनी वस्ती |
पंचायत समिती, नगर येथे तत्कालीन गट विकास अधिकारी डॉ. वसंत गारुडकर यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने या प्रकल्पाचा श्रीगणेशा झाला. शबरी आवास योजनेचा लाभ घेताना लाभार्थ्याकडे स्व मालकीची जागा आवश्यक असते. ७० यापैकी ७ जणांकडेच स्वतःची जागा उपलब्ध होती. म्हणजेच, फक्त ७ लाभार्थी पात्र ठरत होते. उर्वरित ६३ कुटुंबियांचा प्रश्न कायम होता. दरम्यान भाजपप्रणीत केंद्र सरकारने पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थ सहाय्य योजना कार्यान्वित केली. या योजनेचा सामुहिक लाभ घेण्याचे निश्चित केले. त्यासाठी पुन्हा अधिकार्यांकडे पाठपुरावा केला. याकामी खा. सुजय विखे यांनी वैयक्तिक लक्ष घालून लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून दिला.
पंचायत समिती, नगर आणि जिल्हा ग्रामीण विकास विभागाच्या वतीने, ६३ भिल्ल कुटुंबियांना पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थ सहाय्य योजनेतून प्रत्येकी ४२ हजार २०० अनुदान तर शबरी आवास योजनेतून प्रत्येक कुटुंबास १ लाख ५० हजार रुपये अनुदान लाभार्थ्यांना मंजूर झाले आहे. या ६३ कुटुंबियांसाठी, गावातील ग्रामस्थाकरवी गावालगतची दीड एकर क्षेत्र विकत घेतले गेले. त्याक्षेत्रावर १५ घरांची एक रांग अशा चार आडव्या रांगेत या घरांची निर्मिती सध्या सुरु आहे. हे काम अंतिम टप्प्यावर आहे. या प्रकल्पाची तालुक्यासह जिल्ह्यात चर्चा आहे. हा देशातील पहिलावहिला अभिनव उपक्रम ठरेल यात शंका नाही.
ग्रामपंचायत सदस्य कैलास लांडे व आदिवासींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनिता बबन बर्डे यांनीही बरोबरीने मदत केली. सर्व कुटुंबियांची एकत्रित मोट बांधून ठेवली आहे. सामुहिक शक्ती एकवटल्यानेच हे सहज शक्य झाले आहे. हा उपक्रम इतर गावांना दिशादर्शक आणि प्रेरणा देणारा ठरणारा आहे.
या प्रकल्पाचे शिलेदार
हा प्रकल्प अवघ्या काही दिवसांत पूर्णत्वास जात आहे. हा एकूण प्रकल्प मार्गी लावण्यासाठी अनेक अधिकारी आणि राजकीय प्रतिनिधींनी सहकार्य केले आहे. डॉ. वसंत गारुडकर, गट विकास अधिकारी केदारी साहेब, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अहमदनगरचे (DRDA) प्रकल्प अधिकारी परीक्षित यादव, सहाय्यक अधिकारी किरण साळवे यांसह जिल्हा परिषदेचे संबधित अधिकारी यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. हा प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तत्कालीन आमदार विजय औटी यांनी महाराजस्व अभियानांतर्गत मेळावा आयोजित करण्याकामी मोलाची मदत केली. तर खा. सुजय विखे यांनीही वैयक्तिक लक्ष घालून जागेसाठी अर्थ सहाय्य मिळवून दिले.
![]() |
कर्जुने खारे येथील घरकुल योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. (सर्व छायाचित्रे : संग्रहित ) |
आदिवासींना सामावून घेणारा महत्वाकांक्षी प्रकल्प
मुख्य प्रवाहातून कोसो दूर फेकलेल्या भिल्ल समुदायाला नव संजीवनी देणारा हा प्रकल्प ठरेल. झोपडीवजा निवार्यात ऊन, वारा, पावसाने कायम हानी होत होती. आता नव्या पक्क्या घरांत त्यांचे पुनर्वसन होईल. काही अंशी का होईना, त्यांचे मनोधैर्य उंचावेल. त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागून त्यांच्या जीवनमानात कमालीचा फरक जाणवेल. त्यांच्या अंधार्या आयुष्याला प्रकाशमान करण्याचा हा प्रयत्न आहे. आगामी काळात त्यांना शिक्षण प्रवाहात आणणे आवश्यक आहे. त्यासाठी सामुहिक प्रयत्न गरजेचा आहे.
माहिती संकलन : महादेव गवळी
छायाचित्रे : जान सय्यद ( कर्जुने खारे )
COMMENTS