अहमदनगर : शिक्षक बँकेची निवडणूक लक्षात घेऊन पाच वर्ष झोपी गेलेली विरोधी मंडळे खडबडून जागी झाली आहेत. 'गुरूमाऊली'च्या आदर्श कारभाराच...
अहमदनगर :
शिक्षक बँकेची निवडणूक लक्षात घेऊन पाच वर्ष झोपी गेलेली विरोधी मंडळे खडबडून जागी झाली आहेत. 'गुरूमाऊली'च्या आदर्श कारभाराचा धसका घेतल्याने विरोधक बिनबुडाचे आरोप करीत आहेत. 'गुरूमाऊली'ने अवघ्या सव्वा टक्क्यांच्या फरकाने आदर्श कारभार करून राज्यात विक्रम प्रस्थापित केला आहे. तरीही सर्व विरोधकांनी आमच्या पराभवासाठी एक व्हावे हेच गुरूमाऊली मंडळाचे मोठे यश असून स्वबळावर निवडणूक मोठ्या फरकाने जिंकण्याचा विश्वास राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट यांनी व्यक्त केला आहे.
तर, गुरुमाऊली मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब तांबे यांनी म्हटले आहे की, वार्षिक सभा आल्यावर स्वस्त प्रसिद्धी मिळविण्यासाठी पत्रकबाजी करणाऱ्या आणि प्रत्यक्ष आचरणात विसंगती असणाऱ्या लोकांना जिल्ह्यातील सभासद चांगले ओळखून आहेत. शिक्षक बँकेचे झालेला कारभार सर्व सभासदांसाठी खुला असून कोणीही कधीही बँकेत येऊन त्याची खातरजमा करू शकतो. बिनबुडाचे आरोप करून विरोधक फक्त स्वतःचे हसे करून घेत आहेत.
रविवारी होणाऱ्या शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गुरुमाउली मंडळाने आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी चेअरमन राजू रहाणे, व्हाईस चेअरमन उषाताई बनकर, ज्येष्ठ संचालक सलीमखान पठाण, माजी चेअरमन संतोष दुसुंगे, शरद भाऊ सुद्रिक,साहेबराव अनाप,विद्याताई आढाव, बाळासाहेब मुखेकर, अर्जुन शिरसाठ, बाबासाहेब खरात, किसन खेमनर, गंगाराम गोडे, अनिल भवार, सुयोग पवार यांच्यासह गुरुमाऊली मंडळाचे नेते गोकुळ कळमकर,नगरपालिका संघाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र लोखंडे,अनिल टकले,बाळासाहेब सरोदे,विठ्ठल फुंदे,बाळासाहेब तापकीर,पी डी सोनवणे, आर.टी.साबळे,संदिप मोटे ,अशोक गिरी, राजेंद्र सदगीर, मारुती गायकवाड, रामेश्वर चोपडे, निवृत्ती गोरे, किसन वराट आदी उपस्थित होते.
गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे यांनी म्हटले आहे की, बँकेचे कार्यक्षेत्र राज्यभर करण्याबाबत विरोधकांनी सध्या रान उठवले असून त्यांची ही भीती अनाठायी आहे. आपल्या पूर्वजांनी मोठ्या कष्टाने ही बँक जोपासली असून तिचे आज वट वृक्षात रुपांतर केले आहे .या बँकेला नख लावण्याचा प्रयत्न आमच्याकडून कदापि होणार नाही. उलट शांतपणे जर विचार केला तर कार्यक्षेत्र वाढविल्याने बँकेच्या व्यवसायिक उत्पन्नात भर पडणार असून त्याचा फायदा सभासदांना होणार आहे. कोरोनामुळे बँकेच्या निवडणुकीला उशीर होत आहे. यामध्ये संचालक मंडळाचा काहीही दोष नाही. परंतु ज्यांनी त्यांच्या काळामध्ये गैरमार्गाने मुदतवाढ मिळवून वाढलेल्या मुदतीत नऊ जणांची बँकेत भरती केली त्यांना याबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. गुरुमाऊली मंडळ कोणत्याही क्षणी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे. विरोधकांनी याबाबत चिंता करू नये .
बँक शताब्दी वर्षांमध्ये सभासदांना घड्याळ वाटप, सावित्रीच्या लेकी पुरस्काराने महिला भगिनींचा सन्मान करण्यात आला. बँक शताब्दी वर्षाचा शुभारंभ कार्यक्रमावर तत्कालीन चेअरमनच्या मर्जीसाठी विकास मंडळाचा ही कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे शताब्दी शुभारंभ कार्यक्रमावर विनाकारण बँकेचे पैसे खर्च झाले असा आरोप बँक शताब्दी समितीचे अध्यक्ष सलीमखान पठाण यांनी केला.
शिक्षक बँकेमध्ये कायम ठेवीवर सर्वोच्च व्याज देण्याचा नियम मागच्या वर्षी केला. यावेळी कर्जाचा व्याजदर आणि ठेवीचे व्याजदर यामध्ये तीन टक्क्यांच्या फरकाचा पोटनियम दुरुस्त केला जात असून भविष्यकाळात कोणतेही मंडळ सत्तेत आल्यास त्यांना या सीमारेषेच्या बाहेर जाता येणार नाही. विद्यमान संचालक मंडळाने तर अवघ्या सव्वा टक्क्यांच्या फरकाने कारभार करून राज्यामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे असे माजी चेअरमन संतोष दुसुंगे यांनी सांगितले.
COMMENTS