प्रतिनिधी : कर्जत महसूल विभागातील अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने कारवाया केल्या आहेत. मात्र तरीही महसूल विभागातील भ्र...
प्रतिनिधी : कर्जत
महसूल विभागातील अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने कारवाया केल्या आहेत. मात्र तरीही महसूल विभागातील भ्रष्टाचाराच्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. लाचलुचपत पथकाने अशीच एक धडाकेबाज कारवाई केली आहे. कोकणगाव ( ता. कर्जत जि. अहमदनगर ) येथील तलाठ्याने आपल्या खाजगी पंटरकरवी लाचेची मागणी केली होती. या ‘पंटर’ला पथकाने सापळा लावून रंगेहाथ पकडले. याप्रकरणाची तालुक्यात दिवसभर चर्चा रंगली.
घुमरी येथील रहिवाशी प्रवीण अनभुले आणि त्यांचे भाऊ विकास यांनी वडिलोपार्जित शेतजमिनीचे वाटप पत्र करून नोंदणीद्स्ताप्रमाणे सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तलाठी कोकणगाव यांच्याकडे अर्ज दिला होता. त्याआधारे नोंद करून उतारा देण्यासाठी तलाठी मुजहिब शेख याने कार्यालयातील खाजगी पंटर सचिन सुरेश क्षीरसागर ( वय ३५ ) याच्या मार्फत सुरवातीला पाच हजारांची लाच मागितली. अनभुले यांनी नकार दिल्यावर तीन हजार द्यावेत अशी मागणी केली. अखेरीस १ हजार रुपयांवर ‘तोडपाणी’ निश्चित केले.
याप्रकरणी विकास अनभुले यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १५ मार्च रोजी तक्रार दिली. तक्रारीवरून पडताळणी करण्यात आली. सचिन क्षीरसागर याने पंचासमक्ष १ हजार रुपये लाच स्वीकारली. सापळा लावून पथकाने सचिन क्षीरसागर याला रंगेहाथ पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक हरीश खेडकर, पो.नि. शाम पवरे, पो. ना. रमेश चौधरी, विजय गुंगल, पो. अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, राधा खेमनर, संध्या म्हस्के, चालक हरून शेख आदींच्या पथकाने सापळा लावून आरोपीला जाळ्यात अडकवले. त्यानुसार तलाठी मुजहिब शेख आणि सचिन क्षीरसागर या दोघांवर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तलाठ्याने बहाणेबाजी करून याप्रकरणाशी संबध नसल्याचा आव आणला आहे.
भ्रष्ट तलाठ्यावर कारवाई व्हावी : प्रवीण अनभुले ( तक्रारदार आणि सामाजिक कार्यकर्ते )
ग्रामीण भागात महसुली कामे करताना तलाठ्यांकडून शेतकरी, सामान्य जनतेची अडवणूक केली जाते. अर्थपूर्ण तडजोड केल्याशिवाय कोणतंही काम मार्गी लागत नाही. तलाठी कार्यालयातील खाजगी इसमांचा वावर वाढत आहेत. या खाजगी पंटरकरवी हे आर्थिक व्यवहार करतात. शासन निर्णयानुसार तलाठ्यांना खाजगी इसमाला कार्यालयीन कामाला घेता येत नाही. हा नियम डावलून तलाठ्यांनी हे खाजगी पंटर पाळले आहेत. कोकणगाव येथील तलाठी मुजहिब शेख यांच्या सांगण्यावरून सचिन क्षीरसागर याने लाच स्वीकारली. त्याला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी या दोनही आरोपींवर योग्य कारवाई व्हायला हवी. तरच भ्रष्ट अधिकाऱ्यांवर वचक बसेल आणि कायद्याचा धाक निर्माण होईल.
हो कारवाई व्हायलाच पाहिजे
उत्तर द्याहटवा