नगर : केंद्र सरकार विरोधात निदर्शने करताना अहमदनगर शहर कॉंग्रेसचे पदाधिकारी. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. अशा संकट ...
नगर :केंद्र सरकार विरोधात निदर्शने करताना अहमदनगर शहर कॉंग्रेसचे पदाधिकारी.
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. अशा संकट काळात महाराष्ट्राला मदत करण्याऐवजी केंद्राकडून कोंडी करण्याचा कुटील डाव भाजपप्रणित केंद्र सरकार करीत असल्याचा आरोप अहमदनगर शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.
महाराष्ट्राला पुरेशा लस उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी आज अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये युवक काँग्रेस अध्यक्ष अॅड. अक्षय कुलट, क्रीडा काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते पाटील, विद्यार्थी नेते जाहीद शेख, विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे, आदित्य यादव आदी सहभागी झाले होते.
राज्यात कोरोना रुग्णांना रेमेडीसिव्हीर इंजेक्शनची तसेच कोविशिल्ड लशीचा तुटवडा भासत आहे. राज्य सरकार संसर्ग टाळण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असले तरी भाजपप्रणीत केंद्र सरकार ‘आपदा मे अवसर’ अशा पद्धतीने सूड बुद्धीने वागत आहे. केंद्राने मागणीनुसार लशींचा पुरवठा करावा, अन्यथा कॉंग्रेस तीव्र आंदोलन छेडणार आहे.
अॅड. अक्षय कुलट ( युवक काँग्रेस अध्यक्ष )
प्रवीण गीते म्हणाले की, जिल्ह्यामध्ये काँग्रेस कार्यकर्ते कोरोना बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहेत. परंतु पुरेशा प्रमाणामध्ये लस उपलब्ध नसल्यामुळे अनेक केंद्रे ही लस उपलब्ध नसल्यामुळे बंद पडली आहेत. सबंध राज्यभर ही परिस्थिती आहे. यामुळे लसीकरणाच्या मोहिमेला खीळ बसली आहे. त्याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे.
केंद्र सरकारकडून भाजपशासित राज्यांना झुकते माप दिले जात आहे. गुजरात सारख्या राज्याची लोकसंख्या महाराष्ट्र पेक्षा कमी असून देखील गुजरातला जास्त आणि महाराष्ट्राला कमी लस दिली गेली. संकट हे राजकारणासाठी वापरण्याची संधी भाजप सरकारने समजावी ही दुर्दैवाची बाब आहे, अशी टीका वीरेंद्र ठोंबरे यांनी केली आहे.
यावेळी केंद्र सरकारच्या वतीने ११ ते १४ एप्रिल दरम्यान साजरा करण्याच्या करण्यात येत असलेल्या लसीकरण महोत्सवाचा निषेध करण्यात आला. जिथे लसच उपलब्ध नाही तिथे लसीकरणाचा महोत्सव कसा काय साजरा होऊ शकतो, असा सवाल विद्यार्थी नेते जाहिद शेख यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्राला लस लवकरात लवकर पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाली नाही तर येत्या काळात काँग्रेसच्या वतीने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.
COMMENTS