अहमदनगर : एखाद्या व्यक्तीला कामाच्याबदल्यात किती मानधन, पगार, वेतन मिळावे याबाबत तसा तर कोणताही नियम आणि ठोकताळा नाही. पण, जगातील सर्वाधिक...
अहमदनगर :
एखाद्या व्यक्तीला कामाच्याबदल्यात किती मानधन, पगार, वेतन मिळावे याबाबत तसा तर कोणताही नियम आणि ठोकताळा नाही. पण, जगातील सर्वाधिक वेतन घेणारे व्यक्ती कोण असतील आणि त्यांना किती वेतन मिळत असेल, याबाबत जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतोच. तर, जगातील सर्वाधिक वेतन घेणाऱ्या काही व्यक्तींची आपण माहिती घेऊयात.
सर्वाधिक वेतन घेणाऱ्यांच्या यादीत अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांचे नाव आघाडीवर आहे. त्याखालोखाल इलॉन मस्क, टिम कुक आणि सत्या नाडेला यांचा समावेश होतो. मात्र, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ब्लूमबर्ग पे इंडेक्सनुसार, ब्रिटनच्या एका महिलेने या सर्वाना मागे टाकत पहिल्या क्रमांकावर मजल मारली आहे.
डेनिस कोट्स असे या जगातील सर्वाधिक वेतन घेणाऱ्या महिलेचे नाव आहे. ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म बेट ३६५ च्या संस्थापक आणि सीईओ म्हणून डेनिस कोट्स काम पाहतात. त्यांना २०२० या आर्थिक वर्षात ४,७५० कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. ५३ वर्षीय कोट्स ब्रिटनच्या सर्वात श्रीमंत महिलाही आहेत आणि आता त्यांचा जगातील सर्वाधिक पॅकेज मिळवणाऱ्या सीईओंच्या यादीत समावेश झाला आहे. तर अल्फाबेटचे (गुगल) सीईओ सुंदर पिचाई यांना २,१४४ कोटी मिळाले होते. टेस्लाचे सीईओ मस्क यांना ३,५९१ कोटींचे पॅकेज मिळाले होते. अॅपलचे सीईओ टिम कुक यांना ९५७ कोटी रु. तर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेलांना ३०६ कोटी रुपये वेतन मिळाले. कोट्स यांनी कोरोनाशी लढण्यासाठी ब्रिटनच्या सरकारला १०० कोटींपेक्षा जास्त मदत केली.
डेनिस कोट्स यांनी अर्थशास्त्राची पदवी घेतल्यानंतर वडिलांच्या गॅम्बलिंगच्या दुकानात अकाउंटंट म्हणून काम केले. २२ व्या वर्षी त्या एमडी झाल्या. दुकानांची संख्या वाढल्यावर त्यांनी व्यवसाय ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला. ब्लूमबर्ग वेल्थ इंडेक्समध्ये समाविष्ट १७ अतिश्रीमंत व्यक्तींत कोट्स एकमेव महिला आहेत. त्यात व्हर्जिन ग्रुपचे रिचर्ड ब्रॅनसन आणि टोटेनहॅम हॉटस्पर फुटबॉल क्लबचे जो लुई यांचा समावेश आहे.
COMMENTS