अहमदनगर - शेती व्यवसाय करताना शेतकऱ्यांना कोणत्या ना कोणत्या अडचणी आणि समस्या भेडसावत असतात. शेतकरी मोठ्या जिद्दीने व साहसाने यातून मार्ग श...
अहमदनगर -
शेती व्यवसाय करताना शेतकऱ्यांना कोणत्या ना कोणत्या अडचणी आणि समस्या भेडसावत असतात. शेतकरी मोठ्या जिद्दीने व साहसाने यातून मार्ग शोधत उत्तरोत्तर प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करत असतो. मागच्या एका भागामध्ये आपण जंगली पशु वा वन्यजीवांकडून शेतमालाची, पिकाची नासाडी व नुकसान झाल्यास शासन नियमानुसार भरपाई मिळविण्याबाबत माहिती घेतली आहे. खालील लिंकवर क्लिक करून ती माहिती आपण वाचू शकता.
https://www.rajyakarta.in/2021/04/blog-post_1.html
या भागात आपण वन्यजीवांकडून जीवघेणा हल्ला झाला असता मनुष्यहानी किंवा पशुधनाचा मृत्यू झाल्यास शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळते. ते कसे मिळवावे, याबाबत माहिती घेणार आहोत.
वन हद्दीला लागून असणाऱ्या शेतजमिनी कसणे हे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान आहे. पिकांना पाणी देण्यासाठी रात्री-अपरात्री शेतावर जावे लागते. त्यातच काही भागांत हिस्त्र वन्य पशूंचा वावर असल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत धरूनच शेतीची कामे मार्गी लावावी लागत आहेत. हल्ली तर लोकवस्तीच्या भागातही बिबट्या, लांडगे, वाघ, तरस, रानकुत्री, गवा अस्वल, रानडुक्कर आदीसह इतर प्राण्यांचा वावर दिसून येतो. या वन्य प्राण्यांनी अनेक शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ले केले आहेत. त्यात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. काही ठिकाणी तर शेळ्या, मेंढ्या सह पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटनाही मोठ्याप्रमाणावर घडताना दिसतात. गाई, बैल यांच्यावरही हल्ले झाले असून गंभीर जखमी होवून पशुधन दगावलेही आहेत. कधी कधी तर या हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या जनावरांवर उपचार करतांना मोठा आर्थिक भुर्दंडही शेतकऱ्यांना सहन करावा लागतो.
अशा परिस्थितीत वन्यजीव सरंक्षण अधिनियमान्वये शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी अर्थसहाय्य मिळते.
मनुष्य हानी तसेच पशुधनाचा मृत्यू झाल्यास देण्यात येणारे अर्थ सहाय्य :
वाघ, बिबट्या, अस्वल, गवा (बायसन), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती व रानकुत्रे (ढोल) यांच्या हल्ल्यामुळे मनुष्य हानी तसेच पशुधनाचा मृत्यू झाल्यास पुढीलप्रमाणे अर्थ सहाय्य देण्यात येते.
अक्र तपशिल देय असलेल्या अर्थसहाय्याची रक्कम
१ व्यक्ती मृत झाल्यास रुपये १०,००,०००/- (रु. दहा लाख फक्त)
२ व्यक्ती कायम अपंग झाल्यास रुपये ५,००,०००/- (रु. पाच लाख फक्त)
३ व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्यास रुपये १,२५,०००/- (रु. एक लाख पंचवीस हजार फक्त)
४ व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचारासाठी येणारा खर्च . मात्र खाजगी रुग्णालयात औषधोपचार करणे अगत्याचे असल्यास त्याची मर्यादा रुपये २०,०००/- (रु. वीस हजार फक्त) प्रती व्यक्ती अशी राहील. शक्यतो औषधोपचार शासकीय/जिल्हा परिषद रुग्णालयात करावा.
वन्यप्राणी हल्ल्यामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना देय अर्थसहाय्याच्या रक्कमेपैकी रु. ३,००,०००/- (रु. तीन लक्ष फक्त) देय असलेल्या व्यक्तीला तात्काळ धनादेशाद्वारे व उर्वरित रक्कम रु. ७,००,०००/- (रु. सात लक्ष फक्त) त्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या दरमहा व्याज देणाऱ्या संयुक्त खात्यामध्ये ठेव रक्कम (फिक्स डिपोजीट) जमा करण्यात येते.
• वन्यप्राणी हल्ल्यामुळे व्यक्ती मृत/अपंग/जखमी झाल्यास मृत व्यक्तीच्या वारसांना अर्थसहाय्य देण्यासाठी असलेल्या इतर अटी व शर्ती.
• सदर व्यक्तीने वन्यजीव (संरक्षण)अधिनियम.१९७२ च्या तरतुदींचा भंग केलेला नसावा.
• सदर व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईक/मित्र मंडळी यांनी हल्ला झाल्यापासून ४८ तासाच्या आत नजीकच्या वन अधिकारी /कर्मचाऱ्यास कळवावे.
• सदर बाबत विहित पंचनामा, पोस्ट मार्टम अहवाल प्राप्त होऊन मदत देण्याची कार्यवाही केली जाते.
पशुधन मृत्यू/अपंग/जखमी प्रकरणी ग्राह्य नुकसान भरपाई :
अ.क्र. पशुधनाचे (पाळीव प्राण्याचे) नाव देय असलेल्या नुकसान भरपाईची रक्कम
१ गाय, म्हैस व बैल यांचा मृत्यू झाल्यास बाजार भाव किंमतीच्या ७५% किंवा रु. ४०,००० या पैकी कमी असणारी रक्कम.
२ मेंढी, बकरी व इतर पशुधन यांचा मृत्यू झाल्यास वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ मधील कलम २(१८-अ) प्रमाणे बाजार भाव किमतीच्या ७५% किंवा रु. १०,०००/- या पैकी कमी असणारी रक्कम.
३ गाय, म्हैस, बैल, या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास बाजार भाव किमतीच्या ५०% किंवा रु. १२,०००/- या पैकी कमी असणारी रक्कम.
४ गाय, म्हैस, बैल, मेंढी, बकरी व इतर पशुधन जखमी झाल्यास औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्यात यावा. औषधोपचार शासकीय/जिल्हा परिषद पशुचिकित्सालयात करणेत यावा. देय रक्कम मर्यादा बाजार भावाचे २५% किंवा रु. ४०००/- प्रति जनावर यापैकी कमी असणारी रक्कम, उक्त नुकसान भरपाई पशुवैद्यकीय अधिकारयाने दिलेल्या प्रमाणपत्राचे आधारे देण्यात यावी.
वन्यप्राणी हल्ल्यामुळे पशुधनाचा मृत/अपंग/जखमी झाल्यास अर्थसहाय्य देण्यासाठी असलेल्या अटी व शर्ती.
• याबाबत संबंधितांनी घटना घडल्यानंतर जनावराच्या मालकाने ४८ तासाच्या आत जवळील वन विभागास खबर देणे आवश्यक आहे.
• मृत जनावराचे शव पंचनामा होईपर्यंत हलवू नये .ज्या ठिकाणी जनावराचा मृत्यू झाला, त्या ठिकाणापासून १० कि .मी. भागात कोणत्याही वन्य प्राण्याचा ६ दिवसापर्यंत विष देऊन मृत्यू झालेला नसावा.
COMMENTS