प्रतिनिधी : शासनाचा कर चुकवण्याच्या उद्देशाने खोटे लेखे तयार करून दस्तऐवजात खोट्या नोंदी करून व कर्मचाऱ्यांच्या देय असलेल्या रक्कमा हिशोबा...
प्रतिनिधी :
शासनाचा कर चुकवण्याच्या उद्देशाने खोटे लेखे तयार करून दस्तऐवजात खोट्या नोंदी करून व कर्मचाऱ्यांच्या देय असलेल्या रक्कमा हिशोबातून काढून टाकत नगर तालुका दूध संघात ८ कोटी ५२ लाख ६८ हजार २८ रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकणी तत्कालीन संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत, सहकारी संस्थाचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक नारायण धुरपदराव गाधेकर (वय ५४, रा. भुतकरवाडी, सावेडी, नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून २० जणांविरुद्ध भादंविच्या कलम १०९, १२० (ब), ४०६, ४१८, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७७ (अ), ३४ सह महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम-१९६० चे कलम १४६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण
मार्च २०१९ ते मार्च २०२० या काळात नगर तालुका दूध संघात आरोपींनी खोटे लेखे तयार केले. दस्तऐवजात खोट्या नोंदी केल्या. कर चुकवण्याच्या गैरहेतूने नियोजन करून शासनाची फसवणूक होण्याच्या उद्देशाने संगणमताने कट करून खोटे व चुकीचे लेखे तयार केले. फसवणुकीच्या उद्देशाने कर्मचाऱ्यांच्या देय असलेल्या रक्कमा हिशोबातून काढून निरंक (अदृश्य) करून गैरव्यवहार केला. तसेच व्यवहार करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रेरीत केले. कर्मचाऱ्यांच्या रक्कमा अदा करताना जाणीवपूर्वक व अप्रामाणिक, अन्याय होण्याच्या गैरहेतूने भेदभाव करून संशयित व्यवहार केले. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दूध संघातून अॅाडव्हान्सच्या नावाखाली निधीचा गैरव्यवहार व अपराध केल्याचे फिर्यादीत म्हटले.
संबधित प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे करीत आहे.
यांच्यावर झाले गुन्हे दाखल
गोरख पाराजी पालवे, उद्धव रावसाहेब अमृते, किसन बाबुराव बेरड, मोहन संतुजी तवले, कैलास अंजाबापू मते, सागर शेषराव साबळे, भाऊसाहेब गंगाराम काळे, रामदास शंकर शेळके, बजरंग किसन पाडळकर, सुभाष गंगाधर लांडगे, अर्जुन सर्जराव गुंड, राजाराम चंद्रभान धामने, मधुकर किसन मगर, भीमराज रामभाऊ लांडगे, गोरख रामभाऊ काळे, स्वप्नील बाबासाहेब बुलाखे, वैशाली आदिनाथ मते, पुष्पा शरद कोठुळे, गुलाब केरुजी कार्ले, गुलाब मारुती काळे या वीस संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
COMMENTS