प्रतिनिधी : पुढच्या वर्षात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यादृष्टीने चाचपणी तालुक्यातील नेत्यांनी सुरु...
प्रतिनिधी :
पुढच्या वर्षात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यादृष्टीने चाचपणी तालुक्यातील नेत्यांनी सुरु केली आहे. नुकतीच नगर तालुका पंचायत समितीत पदाधिकारी निवडीत तालुका महाविकास आघाडीने मोर्चेबांधणीस सुरुवात केली असल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ यांनीही कॉंग्रेसची साथ सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधण्याचा विचाराधीन आहेत. त्यादृष्टीने त्यांनी गेल्या काही दिवसांपासून चाचपणी करत आहेत.
कोण आहेत बाळासाहेब हराळ ?
कॉंग्रेसचे आक्रमक कार्यकर्ते आणि कट्टर विखे समर्थक तर कर्डिलेंचे कट्टर विरोधक अशी बाळासाहेब हराळ यांची तालुक्यात ओळख आहे. विखे भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसमध्येच रहाण्याचा निर्णय घेतला. पण आजमितीला काँग्रेसमध्ये असून देखील विखे समर्थक असल्याचा त्यांचा शिक्का पुसता पुसत नाही. काँग्रेसमधूनही हवी तशी ताकद त्यांना मिळत नाही. कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांशी त्यांचे सूत जुळत नाही. शिवाय माजी आ. कर्डिलेहे हराळांची कोडी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तशी व्यूहरचना आखली जात आहे.
बाळासाहेब हराळ हे पूर्वी राष्ट्रवादीतच होते. मात्र, अचानक शिवाजी कर्डिले यांनी राष्ट्रवादी प्रवेश केल्याने ते बाहेर पडले. मग त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. सन २००३ मध्ये मध्ये सरपंच पदापासून त्यांनी राजकीय प्रवास सुरु केला. ते थेट जिल्हा परिषद अर्थ आणि बांधकाम सभापतीपदापर्यंत पोहचले.
२००७ मध्ये वाळकी जिल्हा परिषद गटामधून तालुका विकास आघाडीच्या वतीने काँग्रेसकडून निवडणूक लढवताना त्यांनी तत्कालिन राष्ट्रवादी उमेदवार दादाभाऊ चितळकर यांचा पराभव केला. पण त्यांनतर त्यांनी विखे गटाशी सलगी करत अर्थ, बांधकाम खात्याचे सभापतिपदही पदरात पाडून घेतले. २०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकित त्यांनी काँग्रेसकडून लढवताना राष्ट्रवादीचे दादाभाऊ चितळकर आणि सेना भाजप युतीचे रमेश भांबरे यांचा पराभव केला. २०१८ ची निवडणूक महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसकडून लढवत त्यांच्या पत्नी अनिता हराळ यांनी भाजपच्या स्वाती बोठे यांचा पराभव केला.
२००७ पासून हराळ हे विखे समर्थक म्हणून मानले जातात. २०१८ मध्ये विखे कुटुंबीयांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. पण हराळ यांनी काँग्रेसमध्ये राहणे पसंद केले. तरीही त्यांचा विखे समर्थक असल्याचा शिक्का काही पुसत नाही आणि काँग्रेसमध्ये असूनही वरिष्ठ पातळीवरून त्यांना हवी तशी ताकद मिळत नसल्याने त्यांनी राष्ट्रवादीकडे वाटचाल सुरू केल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर तालुक्यात कर्डिले यांनी हराळ यांची वाळकी जिल्हा परिषद गटात कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी आमदार कर्डिले यांचे ऋणानुबंध सलोख्याचे होत आहेत. त्यामुळे किंवा विखे समर्थक शिक्का असल्याने काँग्रेसकडून ताकद मिळत नाही, असा त्यांनी आरोप केला आहे. त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरण्याचा निर्णय घेतला आहे.
तर राष्ट्रवादीला मिळणार ताकद
बाळासाहेब हराळ यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झाला तर नगर तालुक्यात पक्षाला मोठी ताकद मिळू शकेल. हराळ यांच्या रूपाने राष्ट्रवादीला एक आक्रमक चेहरा मिळेल. सध्या माधवराव लामखडे हे तालुक्यात एकमेव राष्ट्रवादीचे सदस्य आहेत. पण लामखडे-कर्डिले यांच्या हितसंबध तालुक्यात सर्वश्रुत आहेत. त्यामुळे हराळ यांच्यारूपाने राष्ट्रवादीला तालुक्यात मोठी ताकद मिळणार आहे. आगामी निवडणुकीत आ. नीलेश लंके आणि माजी आमदार राहुल जगताप यांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे.
COMMENTS