मुंबई : 'महाराष्ट्र थांबला नाही थांबणार नाही' असा राज्य सरकारतर्फे घोषा लावला जातो. कोरोना साथीच्या बाबतीत ही घोषणा लागू आहे का? र...
मुंबई :
'महाराष्ट्र थांबला नाही थांबणार नाही' असा राज्य सरकारतर्फे घोषा लावला जातो. कोरोना साथीच्या बाबतीत ही घोषणा लागू आहे का? राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलेले असताना पुन्हा टाळेबंदीची भाषा केली जाते. हे करून सर्वसामान्य लोकांचे हाल होण्याची सरकार वाट पाहत आहे का? समोर खड्डा आहे हे कळत असून पुन्हा खड्यात जाण्याची इच्छा आहे का? नेमका कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? अशा प्रश्नांची सरबत्ती करून विरोधी पक्ष नेता प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
भारतीय जनता पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दरेकरांनी अशी टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, सरकारला लॉकडाऊन लावायचाच असेल तर अगोदर सर्व क्षेत्रातील कष्टकऱ्यांच्या खात्यात, परीक्षा देणारे तरुण, छोटा व्यवसाय करणारे, तसेच कष्ट करणाऱ्या संघटित व असंघटित कामगारांच्या खात्यात ५००० रुपये जमा करावेत.
काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील लॉकडाउनची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. टाळेबंदीची जर आवश्यकता असेल तर कष्टकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५००० रुपये जमा करावेत, अशीच भूमिका त्यांनी घेतली आहे, असेही दरेकर यांनी म्हटले आहे. एकूणच चव्हाण यांच्या अभ्यासपूर्ण मुद्द्याला यानिमित्ताने भाजपने पाठींबा दिला आहे.
दरेकर यांनी म्हटले आहे की, राज्यात एकदम ढिसाळ कारभार असून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. याला सर्वस्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यसरकार जबाबदार आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा खेळ सुरू आहे. वर्षभरात आलेले अपयश लपवण्यासाठी लॉकडाउन लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. परंतु, सर्वसामान्यांना त्रास होईल अशी कोणतीही भूमिका भाजप खपवून घेणार नाही.
COMMENTS