भोपाळ : वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी भाड्याने राहून ती जागा अथवा घर बळकावू पाहणाऱ्या ठगांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. भाडेकरू कितीही ...
भोपाळ :
वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी भाड्याने राहून ती जागा अथवा घर बळकावू पाहणाऱ्या ठगांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. भाडेकरू कितीही वर्षे राहिला तरी त्याला ते घर बळकावता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयाने दिला आहे. हा निकाला देतानाच न्यायालयाने स्पष्ट केले की, भाडेकरू हा भाडेकरूच असतो आणि घरमालक हाच घराचा खरा मालक असतो.
मध्य प्रदेशातील एका भाडेकरूने घरमालकाला तीन वर्षे भाडे दिले नव्हते तसेच तो दुकान खाली करण्यासही तयार नव्हता. त्यामुळे त्रस्त झालेल्या घरमालकाने न्यायालयाचे दार ठोठावले. कनिष्ठ न्यायालयाने भाडेकरूला थकीत भाडे देण्याचा आणि दोन महिन्यांच्या आत दुकान खाली करण्याचा आदेश दिला होता. त्याचबरोबर खटला दाखल झाल्यापासून दुकान खाली करेपर्यंत दरमहा 35 हजार रुपये भाडे देण्यास सांगितले होते. मात्र संबधित इसमाने कनिष्ठ न्यायालयाचे आदेश पाळले नाहीत.
उलटपक्षी त्या इसमाने न्यायालयीन आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. या प्रकरणात न्यायमूर्ती रोहिंग्टन एफ. नरीमन यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला. दुकान खाली करण्यास तयार नसलेल्या भाडेकरू व्यक्तीस कोणताही दिलासा देण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. तुम्हाला दुकान खाली करावेच लागेल. तसेच थकवलेल्या भाडय़ाची रक्कम देण्यासाठी वाढीव मुदतही तुम्हाला मिळणार नाही, असे खंडपीठाने कडक शब्दांत सुनावले. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने संबधित व्यक्तीस थकीत भाडय़ाचे जवळपास 9 लाख रुपये जमा करण्यास चार महिन्यांचा अवधी दिला होता. मात्र त्याने हा आदेश पाळला नाही. उच्च न्यायालयाने त्याला घर खाली करण्याचा आदेश दिला होता.
काही भाडेकरू काही वर्षे एका ठिकाणी राहिल्यानंतर जबरदस्तीने त्या घराचा ताबा घेतात. त्यामुळे घरमालकाला कोर्ट-कचेऱयाचे उंबरठे झिजवावे लागतात. अशा प्रकारच्या तक्रारींच्या अनेक केसेस न्यायालयात दाखल आहेत. भाडेकरू शिरजोर झाल्याने अनेक घरमालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही दिवस भाड्याने राहून जबरदस्तीने घर, जागा बळकावू पाहणाऱ्या ठगांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे.
COMMENTS