मुंबई : कोरोना रुग्णवाढीने देशात दोन लाखांचा टप्पा ओलांडल्यानंतर भांडवली बाजारात अनिश्चितता निर्माण झाली होती. त्याचे पडसाद गुरुवारी (ता. ...
मुंबई :
कोरोना रुग्णवाढीने देशात दोन लाखांचा टप्पा ओलांडल्यानंतर भांडवली बाजारात अनिश्चितता निर्माण झाली होती. त्याचे पडसाद गुरुवारी (ता. १५) शेअर बाजारात उमटले. सेन्सेक्सने जवळपास ८०० अंकाचा चढ उतार अनुभवला. मात्र, जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांच्या जोरावर शुक्रवारी (ता. १६ एप्रिल) गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात खरेदीचा ओघ सुरु ठेवला. त्यामुळे सकाळच्या सत्रात सेन्सेक्स १८० अंकांनी वधारला, तर निफ्टी ९० अंकाच्या तेजीसह व्यापार करत आहे.
या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी!
आज महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, हिरो मोटो कॉर्प, बॉश्च, एमआरएफ, आयशर मोटर्स, अशोक लेलँड, मारुती, टीव्हीएस मोटर्स यांच्या शेअरमध्ये वाढ झाली. शिवाय एचडीएफसी, एचडीएफसी बँक, एशियन पेंट, एचसीएल टेक, इन्फोसिस, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअरही तेजीत आहेत.
आर्थिक पॅकेजमुळे जागतिक बाजाराला कलाटणी
देशांत गुरुवारी एकूण २ लाख १७ हजार ३५३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. विकसित देशांनी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमुळे जागतिक बाजाराला कलाटणी मिळेल, असे संकेत आहेत. दुसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनची कामगिरीही चांगली झाली. त्यामुळे भांडवली बाजारात तेजी असल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे शेअर बाजार विश्लेषक व्ही. के. विजयकुमार यांनी सांगितले.
सध्या सेन्सेक्स १०३ अंकांनी वधारला आहे. तो ४८,९०६ अंकावर होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७५ अंकांनी वधारला असून, तो १४,६५९ अंकावर आहे. गुरुवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स २५९ अंकांनी वधारला होता, तर निफ्टीत ७६ अंकांची वाढ झाली होती. गुरुवारी परकीय गुंतवणूदारांनी बाजारात ९८० कोटींचे शेअर खरेदी केले होते.
जागतिक बाजारातही तेजी
जागतिक बाजारातही तेजी दिसली. अमेरिकेचा डाऊ निर्देशांक गुरुवारी ३४ हजार अंकांवर बंद झाला. पहिल्यांदाच डाऊ निर्देशांकाने विक्रमी टप्पा ओलांडला. नॅसडॅक कम्पोझिट इंडेक्स १८० अंकांच्या वाढीसह १४०३८ अंकावर स्थिरावला. आज (शुक्रवारी) आशियातील प्रमुख शेअर निर्देशांकात वाढ दिसली.
आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी एकूण २ लाख १७ हजार ३५३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ४२ लाख ९१ हजार ९१७ वर पोहचलीय. आतापर्यंत देशात एकूण १ लाख ७४ हजार ३०८ नागरिकांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. सध्या देशात १५ लाख ६९ हजार ७४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
संपादन : सोनाली पवार
COMMENTS