कोल्हापूर : छायाचित्र प्रतीकात्मक महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. येथील दोन बहिणींची...
कोल्हापूर :
छायाचित्र प्रतीकात्मक |
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. येथील दोन बहिणींची लग्नानंतर जबरदस्तीने कौमार्य चाचणी घेण्यात आली इतकेच नव्हे तर या तपासणीत त्या नापास झाल्याचे शिक्कामोर्तब करून त्यांना घटस्फोट देण्याचा आदेश स्थानिक जात पंचायतीने दिला आहे. मात्र, ही बाब उघडकीस येताच पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी पीडितेचा नवरा, सासू यांच्यासह जात पंचायतीचे सदस्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींवर दोन बहिणींनी केलेल्या तक्रारीच्या आधारे आयपीसी आणि महाराष्ट्र सामाजिक-बहिष्कार कायद्याच्या विविध कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
दोनही पीडित महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कांजरभाट समुदायाचे आहेत. पिडीत मुलींना त्यांच्याच जात समुदायातील दोन पुरुषांनी लग्नाची मागणी घातली. बोलणीनंतर २७ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर दोन्ही बहिणींना स्वतंत्र बेडरूममध्ये नेण्यात आले. तेथे, त्यांच्यावर समाजातील प्रथेनुसार कौमार्य चाचणी घेण्यात आली. या समाजात अशी चाचणी करण्याची परंपरा असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अंनिस कार्यकर्त्यांच्या मदतीने व पुढाकारामुळे संबधित आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले.
संबधित तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ गुन्हे नोंदवून पुढील चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीत असे म्हटले आहे की, दोन्ही बहिणींशी लग्न केलेल्यांपैकी एक पुरुष सैन्यात काम करतो, तर दुसरा व्यक्ती खासगी संस्थेत काम करतो.
कौमार्य चाचणी म्हणजे नेमके काय ?
महाराष्ट्रातील काही जाती समुदायांमध्ये कौमार्य चाचणी करण्याची प्रथा आहे. त्यातीलच कंजारभाट समाजातील नवविवाहित महिलांना या कौमार्य चाचणीचा सामना करावा लागतो. राज्यात या समाजाची लोकसंख्या दोन लाखांवर आहे. ‘कंजारभाट’ भटक्या-विमुक्त जमात प्रवर्गातील समुदाय आहे.
नवरी मुलगी 'खरी' आहे की 'खोटी' हे ठरवण्यासाठी म्हणजेच चारित्र्यवान आहे की नाही हे ठरवणारी मापक पद्धती आहे. या जातीची स्वतंत्र घटना आहे. ती पाळणं जातीतल्या सर्वांना बंधनकारक असते आणि जात-पंचायत त्याविषयीचा न्यायनिवाडा करते.
लग्नाच्या विधीचाच एक भाग म्हणून कौमार्य चाचणी घेतली जाते. त्याशिवाय लग्न ग्राह्य धरलं जात नाही. त्यावर शिक्कामोर्तब करण्याचा अधिकार कंजारभाट समाजाच्या पंचांकडे म्हणजेच जात-पंचायतीकडे असतो.
नवविवाहित जोडप्याला लग्नाच्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी एका खोलीत पाठवलं जातं. गादीवर सफेद चादर किंवा सफेद कपडा अंथरला जातो. यावेळी खोलीबाहेर दोन्हीकडचे नातेवाईक आणि पंच उपस्थित असतात. शारीरिक संबंध करताना रक्तस्त्राव झाला तर नवरी मुलगी 'खरी' म्हणजेच कौमार्य शाबूत होतं, असं समजलं जातं. जर चादरीवर रक्त आढळलं नाही तर त्याचे परिणाम नवऱ्यामुलीला भोगावे लागतात. तिला चारित्र्यहीन म्हणून हिणवलं जातं.
तर चपलेने मारले जाते...
बायकोचं चारित्र्य सिद्ध झालं नाही तर या समाजातल्या पुरुषांना लग्न मोडायचा अधिकार असतो. खोलीतून बाहेर आल्यावर जमलेल्या सर्वांसमोर नवऱ्यामुलाला प्रश्न विचारला जातो, 'तुझी पत्नी खरी आहे की खोटी.' नवऱ्यामुलाने खोटी आहे, असं उत्तर दिलं तर तिला चप्पलेने मारण्याची प्रथाही आहे.
कठोर कारवाई व्हावी : अंनिस
कौमार्य चाचणीच्या या आणखी एका प्रकारानंतर कोल्हापूर आणि बेळगाव सीमाभाग परिसरात खळबळ उडाली आहे. अशा प्रकारच्या अनिष्ठ प्रथांना बळी पडून तरुणींवर कौमार्य चाचणीसारखे अत्याचार करणाऱ्या कुटुंबांवर कडक कारवाई करण्याची मागणी कोल्हापूर अंनिसच्या वतीने गीता हसूरकर यांनी केली आहे.
ही प्रथा म्हणजे नवविवाहित जोडप्याच्या खासगीपणाच्या हक्काचा भंग आहे आणि ज्या पद्धतीने कौमार्य चाचणीची प्रक्रिया पार पडते ती अत्यंद अपमानास्पद, घृणास्पद आणि अमानुष आहे. अनेक महिलांचे आयुष्य या अमानवी प्रथेने उध्वस्त केले आहे. जात पंचायत आणि त्यांचे अधिकार कायदे हे संविधानिक नाहीत. तरीही स्वातंत्र्यानंतर वर्षानुवर्षे ही अघोरी परंपरा सुरु आहे.
COMMENTS