श्रीगोंदा : दरवर्षी उन्हाळ्यात कुकडीच्या आवर्तन सोडण्यावरून राजकारण रंगते. त्यावरून राजकीय पोळी भाजून श्रेय लाटण्याचा प्रकार तालुक्यात सुरु...
श्रीगोंदा :
दरवर्षी उन्हाळ्यात कुकडीच्या आवर्तन सोडण्यावरून राजकारण रंगते. त्यावरून राजकीय पोळी भाजून श्रेय लाटण्याचा प्रकार तालुक्यात सुरु आहे. पुढाऱ्यांनी कुकडीच्या पाण्यासाठी चालवलेले राजकारण थांबवावे. लोकांच्या भावनेशी खेळून आपली राजकीय पोळी भाजू नये. पाणी सुटणार असे समजताच शेतकरी बी बियाणे, खते आणून ठेवतात. मात्र त्या दिवशी पाणी नाही सुटले, तर शेतकऱ्यांचे नुकसान होते. कुकडीचे पाणी द्यायचे असेल, तर याच महिन्यात द्या. पुढच्या महिन्यात नको. तालुक्यातील पुढाऱ्यांचे राजकारणात वजन असताना आपण तालुक्यासाठी पाणी मिळवू शकत नाहीत, याची खंत वाटते. पाण्याचे नियोजन असे करावे, की सर्वसामान्य शेतकऱ्यांना झळ पोहोचणार नाही. त्यासाठी सर्वांनी उपाययोजना सुचवाव्यात, शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या या मुद्द्यावर तालुक्यातील सर्व राजकीय पुढाऱ्यांनी एकत्र यावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य तथा महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती अनुराधा नागवडे यांनी केले आहे.
रविवारी नागवडे साखर कारखान्याच्या गेस्ट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. काँग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष स्मितल वाबळे, वांगदरी गावचे सरपंच आदेश नागवडे, विठ्ठल गायकवाड यावेळी उपस्थित होते.
तालुक्यातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिला आहे, त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी आहे. शेतकरीपुरता खचला आहे, पाण्याचे आवर्तन लवकरात लवकर सोडून त्यांना धीर देण्याची गरज आहे. पाणीप्रश्न सोडवायचा असेल तर सर्वच राजकीय पुढाऱ्यांनी श्रेयवादाचे राजकारण बाजूला सारून एकत्र येऊन पाठपुरावा केला तर हा प्रश्न चुटकीसरशी मार्गी लागेल, असा विश्वास अनुराधा नागवडे यांनी व्यक्त केला.
शासकीय कोविड सेंटरसाठी छत्रपती शिवाजी महाविद्यालयात जागा उपलब्ध करून देणार असून दोन ते तीन दिवसांतच या ठिकाणी २५० बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
COMMENTS