अहमदनगर : कोरोनाचा संसर्गाचा स्फोट उडाल्याने ‘ब्रेक द चेन’ असे कॅम्पेन करून संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने दि. १४ एप्रिलच्या रात्रीपास...
अहमदनगर :
कोरोनाचा संसर्गाचा स्फोट उडाल्याने ‘ब्रेक द चेन’ असे कॅम्पेन करून संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने दि. १४ एप्रिलच्या रात्रीपासून कडक निर्बंध लादले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन केले आहे. लॉकडाऊनमध्ये गोरगरीब आणि गरजूंना पोटाची खळगी भरता यावी, म्हणून महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळी मोफत देण्याचे ठरविले आहे. संचारबंदीमुळे या निर्णयावर सोशल मिडीयावर अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते. यावरून भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना घेरले होते. त्यामुळे शिवभोजन थाळीला मिळणारा प्रतिसाद कसा असणार याकडे लक्ष लागून होते.
दरम्यान, आज शिवभोजन थाळी केंद्रावर रांगा दिसून आल्या. नगरमध्ये मात्र याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. केंद्रावर जेवणासाठी परवानगी नसल्याने केवळ पार्सल देण्यात आले. वेळेआधीच निर्धारित थाळ्या संपल्याने संख्या वाढवून देण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी काही केंद्रांवर थाळ्या संपल्याने पार्सल घेऊन जाण्यासाठी आलेल्या अनेकांना परत जावे लागले. तर काही ठिकाणी गर्दी झाल्याने पोलिसांनी कारवाईही केली.
शिवभोजन थाळी योजना :
महाविकास आघाडीच्या सरकारने गरीबांना स्वस्तात जेवण उपलब्ध व्हावे, यासाठी दहा रुपयांत थाळी देण्याची ही योजना सुरू केली आहे. मागील लॉकडाउनच्या काळात ती पाच रुपयांना करण्यात आली. आतापर्यंत ती पाच रुपयांना देण्यात येत होती. मात्र, नव्याने निर्बंध लागू करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजपासून ही थाळी मोफत केली आहे. कडक निर्बंधाच्या काळात कोणी उपाशी राहू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
वाढीव थाळ्यांचा प्रस्ताव
आज पहिल्याच दिवशी नगर जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर या थाळीला चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात २९ केंद्रांवरून थाळीचे वितरण करण्यात येत आहे. त्यांची क्षमता साडेतीन हजार थाळी प्रतिदिन अशी आहे. वेगवेगळ्या भागातील केंद्रांना वेगवेगळी क्षमता ठरवून देण्यात आलेली आहे. आज निर्बंधाच्या पहिल्याच दिवशी बहुतांश केंद्रांवरील थाळ्या दुपारी लवकरच संपल्या. त्यामुळे जिल्ह्यासाठी आणखी ८०० थाळ्या वाढवून देण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने पाठविला आहे.
विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई :
नगर शहरातील एका केंद्रात चालकच विनामास्क वावरत असल्याचे आढळून आल्यावर त्याला दंड करण्यात आला. केंद्रावर पार्सल घेण्यासाठी गर्दी न करण्याच्या आणि नियम पाळण्याच्या सूचना पोलिस करीत होते. अनेक जण पार्सल घरी घेऊन जात होते, तर काही मजुरांनी केंद्राच्या जवळपासच जागा शोधून तेथे बसून जेवण घेतल्याचेही पहायला मिळाले. विनामास्क येणाऱ्या नागरिकांनाही पोलिसांनी दंड केला असून मास्क वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.
COMMENTS