नांदेड : राज्यासह देशात कोरोनाने थैमान घातले आहे. एकेकाळी काहीअंशी आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वेगाने फैलावत आहे. राज्य सरकारने प्रतिबं...
नांदेड :
राज्यासह देशात कोरोनाने थैमान घातले आहे. एकेकाळी काहीअंशी आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वेगाने फैलावत आहे. राज्य सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मिनी लॉकडाऊनही केले आहे. त्यातच आरोग्य सुविधा अपुऱ्या पडताना दिसत आहे. मराठवाड्यात कोरोनाचा प्रचंड उद्रेक झाला असून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांना जीवदान मिळावे म्हणून प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर आणि मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ही वाढती मागणी लक्षात घेऊन काही दिवसांपासून नांदेडमध्ये कृत्रिम तुटवडा निर्माण करून काळ्या बाजारात याची विक्री करण्याचे प्रकार वाढले होते. यासंदर्भात तक्रारी वाढल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी कारवाई करत इंजेक्शनचा काळा बाजार करणारे रॅकेट पकडले.
रेमडेसिविर या इंजेक्शनची मूळ किंमत ५,४०० असताना आठ हजार रुपयांना विक्री करणाऱ्या टोळीला ताब्यात घेण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यात दोन ते तीन दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शनसाठी नातेवाइकांना पूर्ण शहरभर धावपळ करावी लागत असल्याचे चित्र आहे. इंजेक्शन अव्वाच्या सव्वा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्या तक्रारीवरून स्थानिक गुन्हे शाखेने चार जणांना ताब्यात घेतले आहे. तक्रारदार तरुणाच्या मदतीने सापळा लावून संबधित आरोपींना अटक करण्यात पथक यशस्वी झाले.
गौतम नरसिंगदास जैन (रा. हनुमानपेठ, नांदेड) यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडे याबाबत तक्रार दिली होती.
पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना कारवाईच्या सूचना दिल्या. तक्रारदार गौतम यांच्या मोबाइलवरून कॉल करून चढ्या दराने इंजेक्शन विकणाऱ्यांना शिवाजीनगरातील डॉक्टर लाइन येथे बोलावण्यात आले. सहायक पोलिस निरिक्षक पी.डी. भारती, पोलिस नाईक गंगाधर कदम, बालाजी तेलंग, गणेश धुमाळ यांच्या पथकाने चौघांना पकडले.
यांना घेतले ताब्यात
वीरभद्र संगाप्पा स्वामी (२६, व्यवसाय मजुरी, रा. शिरूर, ता. अहमदपूर), बाबाराव पडोळे (२५, हिंदुस्थान मेडिकल वाजेगाव, नांदेड.), बालाजी भानुदास धोंडे (३४, मेडिकल व्यावसायिक, नांदेड), विश्वजित कांबळे ऊर्फ बारडकर (३६, व्यवसाय एमआर, रा. बारड.) यांना शिवाजीनगर डॉक्टर लाइन भागातून ३६ हजार ४०० रुपये किमतीचे सात इंजेक्शन जास्त दराने विकताना त्यांना ताब्यात घेतले. शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
लातूर : उदगीरमध्ये रेमडेसिविर मिळेना
उदगीरसह जिल्ह्यात तुटवडा जाणवत असून उदगीरमध्ये इंजेक्शन मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. रुग्णांची एचआरसीटी करण्याचे प्रमाण वाढले असून रेमडेसिविरचा वापरही वाढला आहे.
COMMENTS