अन्सार पठाण या सावकाराच्या घराची झडती घेतांना सहकार विभागाचे अधिकारी व कर्मचारी. प्रतिनिधी : अवैध सावकारी करून गरजू लोकांकडून अधिकाधिक व्य...
![]() |
अन्सार पठाण या सावकाराच्या घराची झडती घेतांना सहकार विभागाचे अधिकारी व कर्मचारी. |
प्रतिनिधी :
अवैध सावकारी करून गरजू लोकांकडून अधिकाधिक व्याज उकळणाऱ्या जामखेड (जि. अहमदनगर) येथील सदाफुले वस्तीवरील सावकाराच्या घरावर सहकार खात्याने गुरुवारी छापा घातला. या कारवाईत घराच्या झडतीत संशयास्पद कागदपत्र आढळून आले आहेत. याप्रकरणी अवैध सावकारी अधिनियम कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय आहेर यांनी दिली.
जामखेड येथील अन्सार युसुफ पठाण (सदाफुले वस्ती) अवैध सावकारी करत असल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे दाखल करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक आहेर यांनी जामखेड सहायक निबंधकांना कळवले होते. त्यानुसार सहायक निबंधक देविदास घोडेचोर यांनी घराची झडती घेण्यासाठी पथक नेमले.
या पथकात प्रथम श्रेणी सहकार अधिकारी साहेबराव पाटील, संतोष वासकर, नीलेश मुंढे यांचा समावेश आहे. या पथकाने घोडेचोर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी अन्सार युसुफ पठाण यांच्या घराची पंच व पोलिस कर्मचाऱ्यांसह छापा घातला. या झडतीत कोरे चेक, कोरे बाँड, विसार पावती असे अनेक संशयास्पद दस्तऐवज आढळून आले. कारवाईसाठी पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
खाजगी सावकारांचा जाच असेल तर तक्रार करण्याचे आवाहन
जिल्ह्यात अवैध सावकरांच्या जाचाने त्रस्त व पीडित असलेल्या नागरिकांनी पुढे येऊन सहकार विभागाकडे पुराव्यासह तक्रार नोंदवावी. या तक्रारदाराच्या नावाबाबत गोपनीयता बाळगण्यात येईल. तसेच तक्रारींची दखल घेऊन कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय आहेर यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना म्हटले आहे.
चौकशीनंतर होईल गुन्हा दाखल
या कारवाईत अनेक संशयास्पद कागदपत्रे आढळून आले आहेत. या कागदपत्रांची शाहनिशा होईल. ज्या व्यक्तींशी संबंधित कागद असतील, त्यांच्याशी चर्चा करून व्यवहार कायदेशीर आहेत की बेकायदेशीर याचीही खातरजमा केली जाणार आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई होईल.
COMMENTS