नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज...
नवी दिल्ली :
केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशातील महोबा येथे या प्रकल्पास शुभारंभ होणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात देशातील 8 कोटी कुटुंबाना मोफत गॅस कनेक्शन मिळाले आहे. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात एक कोटी कुटुंबाना गॅस कनेक्शन देण्याचे नियोजन केंद्र सरकारने केले आहे.
2021-22 या वर्षाच्या अर्थसंकल्पात सरकारने याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार नियोजन करण्यात येऊन आता प्रत्यक्षात कार्यवाहीया सुरुवात होणार आहे. सरकारने एक कोटी गॅस कनेक्शन डिपॉझिट मोफत देण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये या योजनेच्या पहिल्या टप्प्यात सहभागी नसलेल्या गरीब कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे.
या योजनेत लाभार्थी कुटुंबाना पहिल्यांदा मोफत भरलेले गॅस सिलिंडर मिळणार आहे. नावनोंदणी प्रक्रिया आधिक सोपी आणि जास्त कागदपत्रांचा त्रास ठेवलेला नाही. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात देशातील आठ कोटी कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळाले आहे. त्यानंतर मात्र सरकारने या योजनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. त्यामुळे देशात अनेक ठिकाणी ग्रामीण भागातील लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत, असे विरोधक सांगत आहेत.
दरम्यान, एलपीजी गॅस कनेक्शन बाबत मोदी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नागरीकांचा फायदा होणार आहे. सध्या बेसिक कनेक्शनवर जी सबसिडी मिळत आहे, त्याच आधारावर घेतलेल्या इतर कनेक्शनसाठी सुद्धा सबसिडी मिळणार आहे. उज्वला योजनेअंतर्गत अशा प्रकारचे गॅस कनेक्शन बुक केले जाऊ शकतात. यासाठी आपल्याला फक्त आपले आधार कार्ड आणि जुन्या गॅस कनेक्शनशी संबंधित कागदपत्रे गॅस एजन्सीला द्यावी लागतील. आणि नवीन गॅस कनेक्शन साठी अर्ज करावा लागेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबत वृत्त दिले आहे.
या निर्णयानुसार एकाच पत्त्यावर अनेक गॅस कनेक्शन घेतले जाऊ शकतात. सर्व गॅस कनेक्शन आधारशी जोडलेली असल्याने कोणत्याही प्रकारची फसवणूक होण्याची शक्यता नाही. सरकार एकाच पत्त्यावर अनेक गॅस कनेक्शन ची सुविधा उपलब्ध करून देत आहे आणि यामध्ये वाढ करण्याचाही सरकारचा विचार आहे. त्या दृष्टीने सरकारचे नियोजन सुरू आहे. ऑनलाईन अर्ज किंवा एलपीजी गॅस कनेक्शन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया देखील सरकारने आता सोपी केली आहे. या सुविधेअंतर्गत कुटुंबातील व्यक्तीच्या नावाने गॅस कनेक्शन घेतले असेल तरी कुटुंबातील इतर सदस्यही या पत्त्याचा लाभ घेऊ शकतात. अशा प्रकरणात फक्त पत्त्याची पडताळणी होईल.
योजनेचा लाभ घेण्यासाठी...
या योजनेअंतर्गत तुम्ही घरी बसून कनेक्शनसाठी अर्ज करू शकता. अर्ज करणाऱ्या महिलेचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे. अर्जदाराचे बँक खाते आणि दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड आवश्यक आहे. ऑनलाइन अर्जासाठी प्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईट https://www.pmuy.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. तेथे तुम्हाला ऑनलाईन अर्जाचा पर्याय निवडावा लागेल. तुम्हाला कोणत्या कंपनीला गॅस कनेक्शन घ्यायचे आहे ते निवडावे लागेल. त्यानंतर तुम्हाला काही माहिती विचारली जाईल, जी भरून सबमिट करावी लागेल. आपण इच्छित असल्यास, आपण तेथून फॉर्म डाउनलोड करू शकता आणि तो भरून जवळच्या गॅस एजन्सी डीलरकडे सबमिट करू शकता.
COMMENTS