नवी दिल्ली : देशात कोरोना प्रतिबंधक लसींची कोणतीही टंचाई नसल्याचा दावा केंद्र सरकार करत असले तरी परिस्थिती मात्र वेगळीच आहे. आजही राज्याना...
नवी दिल्ली : देशात कोरोना प्रतिबंधक लसींची कोणतीही टंचाई नसल्याचा दावा केंद्र सरकार करत असले तरी परिस्थिती मात्र वेगळीच आहे. आजही राज्याना पुरेशा प्रमाणात आणि वेळेत लसी मिळत नाहीत. त्यामुळे लसीकरणात अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी लसीकरण बंद ठेवावे लागत आहे. त्यामुळे देशभरातच लसीकरण मोहिमेचा वेग कमी झाला आहे. विरोधक या मुद्द्यावर केंद्र सरकारवर जोरदार टीका करतच आहेत. त्यानंतर आता अन्य क्षेत्रातील तज्ज्ञ सुद्धा केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आवाज उठवत आहेत.
आता नोबेल पुरस्कार विजेते प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ अभिजीत बनर्जी यांनी लसीकरणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशातील राज्यांना पुरेशा प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा करण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा गंभीर आरोप बनर्जी यांनी केला आहे. पश्चिम बंगाल सरकारच्या वतीने आयोजित ग्लोबल एडवायजरी बोर्डाच्या बैठकीत त्यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली.
केंद्र सरकार देशास पुरेशा प्रमाणात लसी उपलब्ध करून देण्यात सक्षमच नाही, हीच खरी समस्या आहे. जर पुरेशा प्रमाणात लसी उपलब्ध असत्या तर या प्रकारची वक्तव्ये दिसली नसती. लसींबाबत देशास जे वचन दिले होते त्यानुसार लसी मात्र मिळत नाहीत.
देशात आता दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. देशात तिसरी लाट आली तरी आता या लाटेचा सामना करण्यास पूर्णपणे सक्षम आहोत, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. देशात दुसऱ्या लाटेत हाहाकार उडाला होता. रुग्णवाढीचा वेग इतका जबरदस्त होता की एक दिवसात चार लाख रुग्ण सापडत होते. इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली. ऑक्सिजनचे मोठे संकट निर्माण झाले. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले.
या काळात मृत्युदर सुद्धा वाढला होता, पॉझिटिव्हिटी रेट वाढला होता, अशी विदारक परिस्थिती या काळात होती. त्यामुळे तिसरी लाट आलीच तर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने नियोजन करण्यास सुरुवात केली. देशातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर भर दिला. ऑक्सिजन कमतरता दूर करण्यासाठी देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यात आले. नवीन दवाखान्याचे बांधकाम सुरू करण्यात आले. औषधे आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा योग्य प्रमाणात होतील याचे नियोजन करण्यात आले, त्यामुळे आता तिसरी लाट आली तरी या लाटेचा सामना करण्यास तयार असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.
COMMENTS