पावसामुळे इसळक - खातगाव रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून दोनही बाजूंनी बाभळींचा वेढा पडला आहे. शेतकऱ्यानी दिला इशारा; सोशल मीडियातू...
![]() |
पावसामुळे इसळक - खातगाव रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून दोनही बाजूंनी बाभळींचा वेढा पडला आहे. |
शेतकऱ्यानी दिला इशारा; सोशल मीडियातून वेधले लोकप्रतिनिधींचे लक्ष.
निंबळक : प्रतिनिधी
अत्यंत दुरावस्था झालेला इसळक ते खातगाव या रस्त्याचे काम मार्गी लागावे, अनेकदा मागणी करूनही दुर्लक्ष झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी नामी शक्कल लढवली आहे. सोशलमीडियातून सध्या याबाबत एक पोस्ट व्हायरल होत आहे. यातून हा रस्ता जर लवकरात लवकर मार्गी लावला नाही, तर आगामी जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकांच्या वेळी ‘मते’ मागायलाही येऊ नका, असा थेट इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या पोस्टची परिसरात जोरदार चर्चा आहे.
इसळक येथील शेतकरी संघटनेचे नेते संदीप गेरंगे यांनी फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून ही पोस्ट सर्वप्रथम शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, हा शेतीवहिवाटीचा महत्वाचा रस्ता आहे. प्रचंड दुरावस्था झाल्याने शेती मशागतीची आणि पिकांची काढणी करतांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यामुळेच शेतकऱ्यांचे मुग आणि उडीदाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. लोकप्रतिनिधी मात्र या प्रमुख आणि मुलभूत समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
संदीप गेरंगे यांच्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘इसळक ते खातगाव रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली आहे. शेती वहिवाटीसाठी हा रस्ता खूप महत्वाचा आहे. पावसाळ्याच्या दिवसांत तर या रस्त्याने पायी देखील चालणे मुश्कील होऊन बसते. मुग आणि उडीद या पिकांची काढणी सध्या जोरात आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेकांना हाती आलेले पीकही पदरात पडणार की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
रस्त्याच्या कडेला दुर्तफा बाभळींचा वेढा पडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याचे काम प्रलंबित आहे. वारंवार मागणी होऊन देखील या कामास अद्याप मुहूर्त लाभलेला नाही. लोकप्रतिनिधीही या महत्वाच्या कामाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत. मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीत हा रस्ता करून देऊ, अशी आश्वासने दिली गेली. सहा महिन्यांवर जिल्हा परिषद निवडणुका येऊन ठेपल्या असल्या तरी अद्याप या रस्त्याच्या काम मार्गी लागलेले नाही. साधारणपणे वर्षभरापूर्वी इसळकच्या बाजूने फक्त १ किलोमीटरचा रस्ता झाला आहे. शेतीशिवार जेथून सुरु होतो, त्याच्या आतच रस्ता संपतो. पुढची वाट अत्यंत बिकट झाली आहे. याकडे लवकरच लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा आगामी निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार परिसरातील शेतकऱ्यांनी करणे गरजेचा आहे.
शेतमालाच्या बाजाराभावाचे प्रश्न, नैसर्गिक आपत्ती त्यातच कोरोनाचे संकट अशा चहुबाजूनी शेतकरी अडचणीत आहे. असे असताना रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी वाढ आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेच्या बाभळी लवकरात लवकर हटवून रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण करणे आवश्यक आहे.
शेती वहिवाटीसाठी हा रस्ता तुम्हालाही महत्वाचा वाटत असेल तर ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करावी. त्यातून किमान आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या डोक्यात थोडा तरी उजेड पडेल, अशी अपेक्षा.’
COMMENTS