अहमदनगर : प्रतिनिधी शहरातील नालेगाव परिसरातील श्री वारुळाचा मारुती येथील 13 ऑगस्ट रोजी नागपंचमीच्या दिवशी होणारी पचंबा यात्रा यावर्षी कोरो...
अहमदनगर : प्रतिनिधी
शहरातील नालेगाव परिसरातील श्री वारुळाचा मारुती येथील 13 ऑगस्ट रोजी नागपंचमीच्या दिवशी होणारी पचंबा यात्रा यावर्षी कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्याचा निर्णय वारुळाचा मारुती मंदिर यात्रा कमिटीने घेतला आहे. याबाबत माध्यमांना युवक प्रबोधन समितीचे अध्यक्ष तथा यात्रा कमिटीचे समन्वयक हभप सिद्धीनाथ मेटे महाराज यांनी माहिती दिली.
शहरातील ऐतिहासिक सिना नदीच्या तिरावर वारुळाचा मारुतीराया स्वयंभु जागृत देवस्थान आहे. याठिकाणी निजानंद स्वामी, संत जयराम नाना, सिताराम बाबा, कल्याण दास बाबा, रावळेबाबा या महान साधु संतांची तपश्चर्या व वास्तव्य झालेले आहे. आजही ह.भ.प. यशवंत गुंड बाबा यांची मंदिरात 71 वर्षापासून अखंड सेवा चालु आहे. सर्वच ठिकाणचे धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे दरवर्षी यात्रा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडतो. हजारो भाविक भक्त विविध भागातून या ठिकाणी यात्रेसाठी येतात. परंतु सध्या कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता यात्रा उत्सव रद्द करण्यात येत आहे. जागृत देवस्थान श्री वारुळाचा मारुतीरायांवर अपार श्रध्दा असलेल्या भाविक भक्तांची यावर्षी दर्शना अभावी गैरसोय होत असल्याने खेद वाटत आहे.
अनादी कालांपासून साधु संतांनी सुरु केलेली ही नागपंचमी व पचंबा यात्रा उत्सवाची परंपरा आहे. तसेच अहमदनगरच्या पहिल्या पचंबा यात्रेचा मान श्री वारुळाचा मारुतीरायांचा असतो. यावर्षीही श्रावण शुद्ध पंचमीला होणारा नागपंचमी व पचंबा यात्रा आहे. मात्र कोरोनाचे संक्रमण रोखण्या करीता भाविकांनी वारुळाचा मारुती मंदिर व परिसरात गर्दी न करता आपल्या घरीच प्रसाद व नैवद्य करुन पुजा - अर्चा करावी. प्रशासनाला सहकार्य करावे. पंचमीच्या दिवशी सकाळी साडेसात वाजता केवळ महापूजा केली जाईल. त्या व्यतिरिक्त दिवसभर कोणतेही विधी, कार्यक्रम करण्यात येणार नाहीत, असे कमिटीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पाळणे, खेळणीसह इतर दुकाने लावू नयेत
प्रतिवर्षी वारुळाचा मारुती परिसर पाळणे, खेळणी दुकाने यांनी मोठ्या प्रमाणात थाटत असतात. मात्र यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोणत्याही दुकानदाराने कोणत्याही प्रकारचे दुकान लावू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन श्री वारुळाचा मारुती मंदिर व पचंबा यात्रा कमिटीने केले आहे.
COMMENTS