नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असणाऱ्या किल्ले शिवनेरी येथे १०० फुटी भगवा ध्वज उभारण्यात यावा यांसह विविध मागण्यांबाबत शि...
नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असणाऱ्या किल्ले शिवनेरी येथे १०० फुटी भगवा ध्वज उभारण्यात यावा यांसह विविध मागण्यांबाबत शिरूर मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेतली. यावेळी शिवनेरीवर ध्वज उभारण्यासह बहुतेक मागण्यांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच विकास आराखडा सरकारकडे सादर करण्यात येणार आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या समाज माध्यमातील खात्यावरून ही माहिती दिली आहे.
डॉ. कोल्हे यांनी म्हटले आहे की, शिवनेरीवर १०० फुटी ध्वज उभारण्यासाठी भारत सरकारच्या पुरातत्व विभागास यासंदर्भातील ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत आवश्यक ते निर्देश देण्यात येतील असे आश्वासन रेड्डी यांनी दिले.शिवरायांच्या जन्मस्थळी गेल्यानंतर तेथे स्वराज्याचे प्रतिक असणारा भगवा ध्वज नसल्याची खंत होती.
याबाबत सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे. केंद्रीय मंत्र्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने नजिकच्या काळात शिवनेरीवर भगवा ध्वज डौलात फडकताना दिसेल. याच भेटीदरम्यान लेण्याद्री व शिवनेरी येथील रोप वे बाबतही चर्चा केली.
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी 'सीआरएफ' मधून निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली असल्याचे श्री रेड्डी यांच्या निदर्शनास आणून दिले. यासाठी देखील पुरातत्व विभागाच्या ना-हरकत प्रमाणपत्राची गरज असल्याचे स्पष्ट केले. यावर याबाबत गडकरीजी यांच्यासोबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येइल असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. यासोबतच आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून जुन्नर तालुका विकसित करणे, भक्ती-शक्ती कॉरिडॉर अशा विविध प्रकल्पांसंदर्भातही रेड्डी यांच्याशी चर्चा केली.
यावेळी शिवनेरी किल्ला,लेण्याद्रि डोंगरावरील बौद्ध लेणी समूह, अष्टविनायक गणपती, धरणांची साखळी, विलोभनीय सृष्टी सौंदर्याने नटलेला परिसर आदींची माहिती श्री. रेड्डी यांना दिली. भक्ती-शक्ती कॉरिडॉरची संकल्पना केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांना चांगलीच आवडली असल्याने एकूण चर्चेला सकारत्मक प्रतिसाद मिळाला, असे खा. डॉ. कोल्हे यांनी म्हटले आहे.
शिवनेरी, वढु बु. तुळापूर ही ऐतिहासिक स्थळे, भीमाशंकर, लेण्याद्रि, ओझर, रांजणगाव,थेऊर हे अष्टविनायक गणपती, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी असलेले श्री क्षेत्र आळंदी, निमगाव खंडोबा अशा भक्ती स्थळांचे कॉरिडॉर तयार केल्यास पर्यटनासाठी मोठी संधी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
पर्यटन स्थळांच्या विकासाबाबत मंत्री जी. किशन रेड्डी यांनी भेट दिल्याबद्दल खा. कोल्हे यांनी आभार व्यक्त केले.
COMMENTS