लेखक, साहित्यिक, विचारवंत राजन खान. विशेष लेख : सध्या अफगाणिस्तानवर तालिबानी आतंकवाद्यांनी कब्जा केला आहे. जगभरात त्यावर चर्चा झडत आहेत. त्...
लेखक, साहित्यिक, विचारवंत राजन खान. |
विशेष लेख :
सध्या अफगाणिस्तानवर तालिबानी आतंकवाद्यांनी कब्जा केला आहे. जगभरात त्यावर चर्चा झडत आहेत. त्यावरून अनेक साहित्यिक, विचारवंत, लेखक, पत्रकार आदींनी वेगवेगळ्या भूमिका मांडल्या आहेत. याच अनुषंगाने साहित्यिक, लेखक आणि अक्षर मानव संस्थेचे संस्थापक राजन खान यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राजन खान यांची ‘ही’ फेसबुक पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. त्यांची पोस्ट मानवी मनाला विचार करायला लावणारी आहे. आमच्या वाचकांसाठी विचारवंत राजन खान यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी :
तालिबान वाईट असतात.
आमची जात श्रेष्ठ न् तुमची जात नीच म्हणणारे चांगले असतात.
आमचा धर्म श्रेष्ठ न् तुमचा धर्म नीच म्हणणारे चांगले असतात.
परस्त्री मातेसमान असते म्हणणारांच्या प्रत्येक गावात आयाबहिणींना वेश्याव्यवसाय करावा लागतो ते लोक चांगले असतात.
सरकारी अधिकारी आणि पुढारी जिथं जाती, धर्म, पैसा यांचा खेळ करून समाजाची वाट लावतात ते चांगले असतात.
जिथं अधिकारी, पुढारी आणि जनता यांचं नातं भ्रष्टाचाराचं असतं ते लोक चांगले असतात.
प्रत्येक ठिकाणी वशिला लावल्याशिवाय कामं होत नाहीत ते लोक चांगले असतात.
जिथं शिक्षण, आरोग्य व्यवसाय असतात आणि असुविधेनं लाखो लोक मरतात ते लोक चांगले असतात.
जिथं मिनिटाला तीन बलात्कार होतात ते लोक चांगले असतात.
जिथं माणसांना क्षुद्र, दलित, आदिवासी, भटके, विमुक्त म्हटलं जातं आणि हीन ठरवलं जातं ते लोक चांगले असतात.
जिथं पोलीस खातं आणि न्यायव्यवस्था भ्रष्ट असते ते लोक चांगले असतात.
जिथं सरकारच दहशदवादी कृत्य करून आपल्याच सैनिकांना मारतं ते लोक चांगले असतात.
जिथं जाती आणि धर्मांच्या नावांनी राजकारण चालतं आणि माणसं एकमेकांना मारून टाकतात ते लोक चांगले असतात.
जिथं वर्षाला एक लाख महिला हुंड्यापायी मारल्या जातात ते लोक चांगले असतात.
जिथं शंभरापैकी नव्व्याण्णव घरांमध्ये स्त्रिया दुय्यम असतात आणि महिला अत्याचार जोरात चालतात ते लोक चांगले असतात.
जिथं गुंड दादा असतात ते लोक चांगले असतात.
जिथं पत्रकारांचे खून होतात किंवा त्यांना सरकारविरुद्ध लिहिलं म्हणून तुरुंगात टाकलं जातं ते लोक चांगले असतात.
जिथं सरकारच स्वतःची घाणेरडं बोलणारी ट्रोल आर्मी अब्जावधी रुपये खर्चून पोसतं ते लोक चांगले असतात.
जे लोक वाहतुकीचे साधे नियमसुद्धा पाळत नाहीत ते लोक चांगले असतात.
जिथं कायदा विकत घेता येतो ते लोक चांगले असतात.
जिथं निधर्मी लोकशाही असूनही निवडणुका जाती, धर्म यांच्या आधारावर आणि पैसा, कोंबड्या, दारू, लालूच दाखवून होतात ते लोक चांगले असतात.
असं चांगलं असण्याची यादी संपणारी नाही.
तालिबान वाईट असतात.
COMMENTS