आ. नीलेश लंकेंनी अखेर मौन सोडले; तहसीलदार देवरे यांच्यावर केले गंभीर आरोप नगर-पारनेरचे आमदार नीलेश लंके अहमदनगर : प्रतिनिधी पा...
आ. नीलेश लंकेंनी अखेर मौन सोडले; तहसीलदार देवरे यांच्यावर केले गंभीर आरोप
नगर-पारनेरचे आमदार नीलेश लंके |
अहमदनगर : प्रतिनिधी
पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात आमदार नीलेश लंके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दुपारनंतर आ. लंके यांनी यावर खुलासा करणारा व्हिडीओ पोस्ट केला असून त्यामाध्यमातून त्यांनी आरोपांचे खंडन केले असून तहसीलदार देवरे यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे याप्रकरणी आणखी नवे वळण पहायला मिळत आहे.
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या व्हायरल ऑडिओमुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी थेट राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे लोकप्रिय आमदार निलेश लंके यांनाच लक्ष्य केल्याने अनेकांचे लक्ष या प्रकरणाकडे गेले आहे. दरम्यान, आत्महत्येचा विचार मनात येत असल्याचे देवरे यांनी म्हटल्याने भाजपने हे प्रकरण उचलले आहे. त्याचवेळी आमदार लंके यांनी देवरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे जबाबदार लोकप्रतिनिधी असलेल्या लंके यांनी केलेल्या दाव्यामुळे आता संबंधित तहसीलदार यांच्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
लंके यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना व्हिडिओमध्ये म्हटलेय की, दोन दिवसांपासून तहसीलदार देवरे यांची जी क्लिप व्हायरल होत आहे त्यासंदर्भात सांगतो की, त्यांनी हा केविलवाणा प्रयोग केला आहे. आठ दिवसांपूर्वी त्यांच्यावर काही गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले आहेत. तसा अहवालही नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी मुंबईला पाठवला आहे. याअगोदर त्यांनी बरेच अशा स्वरूपाचे प्रकार त्यांनी केले आहेत. माझ्यासमोर त्यांच्या भ्रष्टाचाराच्या गोष्टी माझ्यासमोर आल्या त्यावेळी व्यक्तिगतरीत्या त्यांना सूचित केल्यावर त्यांनी रात्री-अपरात्री मेसेज करून आत्महत्येची धमकी दिली होती. आतापर्यंत असे बरेच प्रकार झालेले आहेत.
त्या ज्या विभागात काम करतात, त्या विभागातील अधिकाऱ्यांनाही त्या दोषी धरतात. कारण, निवासी उपजिल्हाधिकारी व प्रांताधिकारी आणि इतर अधिकारी या सर्वांना त्या दोषी धरतात. आपण स्वतः साधुसंत असल्यासारखे काम करताना इतर चुकीचे काम करतात असे भासवण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले आहेत. त्याची सखोल चौकशी चालू आहे. आपल्याला काहीतरी बचाव करण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे, असेही आमदार लंके यांनी म्हटलेले आहे.
आमदार लंके यांनी तहसीलदार देवरे यांच्यावर प्रशासकीय कारवाई होणार असल्याचे सूचित केलेले आहे. त्यामुळे आता मुबईतून मंत्रालयाच्या पातळीवर अशा भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार आणि देवरे यांची बदली झाल्यास पारनेर तालुक्याला आता कोण नवे तहसीलदार येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी लक्ष वेधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्र लिहिलेले आहे.
COMMENTS