पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते बाबुर्डी बेंद गावचा सन्मान स्वीकारताना माधुरी चोभे, उपसरपंच अण्णा चोभे समवेत इतर मान्यवर. प्रतिनिधी : अ...
पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते बाबुर्डी बेंद गावचा सन्मान स्वीकारताना माधुरी चोभे, उपसरपंच अण्णा चोभे समवेत इतर मान्यवर. |
प्रतिनिधी : अहमदनगर
पाणी हा मानवी जीवनातील अत्यंत महत्वाचा घटक आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. पाण्यामुळे शेती फुलते. अर्थचक्राला गती मिळते. त्यातून मानवी जीवनमान उंचावते, म्हणूनच ‘पाणी’ वाचविण्यासाठी गावांनी मोहीम हाती घेतली पाहिजे, असे मत पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.
प्रसिद्ध सिनेअभिनेते अमीर खान यांच्या संकल्पनेतून आणि ‘पानी फौंडेशन’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेत नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद गावाने बाजी मारली. या योजनेत तालुक्यातील अनेक गावांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेच्या पात्रता फेरीत बाबुर्डी बेंदसह सहा गावांची निवड करण्यात आली होती. या योजनेत विविध निकषांच्या आधारावर पारितोषिकांचे वितरण करण्यात येत आहे.
स्पर्धेत विहीर पाणी पातळी, विहीर, बोअरवेल गणना, हंगामनिहाय पीक सर्वे अशा विविध निकषांच्या आधारावर बाबुर्डी बेंदने बाजी मारली आहे. शनिवारी (दि. २८) आदर्शगाव हिवरेबाजार येथे आयोजित कार्यक्रमात विजेत्या आणि स्पर्धेत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या गावांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पद्मश्री पोपटराव पवार बोलत होते.
बाबुर्डी बेंद गावच्या वतीने वॉटर हिरो माधुरी चोभे आणि उपसरपंच अण्णा चोभे यांनी पद्मश्री पोपटराव पवार यांच्याहस्ते हा सन्मान स्वीकारला. यावेळी पाणी फौंडेशनचे डॉ. अविनाश पोळ उपस्थित होते.
बाबुर्डी बेंद गावच्या वॉटरहिरो सारिका भुजबळ, सुवर्णा मोकाटे (महाराज), सतीश महाराज चोभे, निलेश चोभे, सरपंच दीपक साळवे आणि उपसरपंच अण्णा चोभे यांनी स्पर्धेत खऱ्या अर्थाने काम केले. पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक दिलीप कातोरे यांनी यासाठी लागेल ती मदत आणि मार्गदर्शन केले. सतीश महाराज चोभे यांनी झोकून देऊन काम करीत गावाला पुढच्या टप्प्यांसाठी तयार केले असल्यानेच हा सन्मान मिळाला असल्याची भावना माधुरी चोभे यांनी व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना, गावचा स्पर्धेत सन्मान झाल्याने विशेष आनंद होत असला तरी पुढची जबाबदारीही वाढली आहे. स्पर्धेत आणखी चांगली कामगिरी करण्याच्या दृष्टीने तयारी करून गावाला पाणीदार करण्याचे आव्हान आमच्यासमोर असणार आहे, असे मत उपसरपंच अण्णा चोभे यांनी व्यक्त केले.
COMMENTS