ह.भ.प. जब्बर महाराज शेख यांचे प्रतिपादन. श्री संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठान आयोजित संगीत भजन स्पर्धेचे बक्षिस वितरण कार्यक्रम. आष्...
ह.भ.प. जब्बर महाराज शेख यांचे प्रतिपादन.
श्री संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठान आयोजित संगीत भजन स्पर्धेचे बक्षिस वितरण कार्यक्रम.
आष्टी : प्रतिनिधी
संत शेख महंमद महाराजांनी महाराष्ट्राच्या भूमीला समतेचा, शांततेचा मार्ग सांगितला. अंधश्रद्धा, कर्मकांडाला विरोध केला. महाराजांचे साहित्य आणि विचार आजही दुर्लक्षित आहेत. ही बाब खेदजनक आहे. समाजाच्या सर्वांगीण उद्धारासाठी त्यांच्या विचारांची पेरणी आवश्यक आहे. आजपर्यंत त्यांचे विचार भजन, कीर्तन, प्रवचन, दिंडीच्या माध्यमातून समाजाला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मात्र, वयोमानुसार त्याला आता मर्यादा येत आहेत. हा विचारांचा वारसा अखंडपणे पुढे नेण्यासाठी युवकांनी पुढे यावे असे आवाहन संत शेख महंमद महाराजांचे चौदावे वंशज ह.भ.प. जब्बर महाराज शेख यांनी व्यक्त केले. प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराजांचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहण्यास मदत होत आहे. याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
श्री क्षेत्र वाहिरा येथे श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर सभामंडपात आयोजित कार्यक्रमात संगीत भजन स्पर्धेचे बक्षिस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
यावेळी श्री संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह.भ.प. सिध्दीनाथ मेटे महाराज, पंचायत समिती सदस्य दादासाहेब झांजे, प्रा. रतन फरतारे सर, उपसरपंच सतिष आटोळे, रोहिदास झांजे, बापु झांजे, श्री. फक्कड झांजे, नारायण आटोळे, ह.भ.प. गणेश महाराज, रुपचंद झांजे आदींसह ग्रामस्त उपस्थित होते.
पंचायत समिती सदस्य प्रा. दादासाहेब झांजे म्हणाले की, संगीत भजन स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपर्याीत महाराजांचे अभंग पोहोचले. त्या अनुषंगाने त्यांचे साहित्य आणि विचार नव्या पिढीसमोर आले आहे. प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
ह.भ.प. मेटे महाराजांनी यापुढच्या काळात भव्य दिव्य स्वरुपात संगीत भजन स्पर्धेचे आयोजित केले जाईल, आणि महाराजांच्या साहित्यकृती, ग्रंथांचा प्रचार – प्रसाराचे काम हाती घेतले जाणार असल्याबाबत भूमिका मांडली.
यावेळी उपस्थित कु. वैष्णवी मुखेकर, कु. माधुरी बनसोडे, कु. श्रावणी थोरवे, वैशाली ढगे, चि. क्षितीज आटोळे, कु. प्रांजला आटोळे, कु. ऋषाली ढगे, कु. प्रिती पवार या स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला. तर उर्वरीत विजेत्या स्पर्धकांचा डिजीटल सन्मानपत्र मेलद्वारे व धनादेश त्यांच्या बँक अकाऊंटवर पाठवण्यात आल्याचे सचिव किसन आटोळे यांनी सांगीतले.
कोरोनाच्या संकटांमुळे केवळ मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक, धनादेश व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किसन आटोळे यांनी तर सदाशिव पगारे यांनी आभार मानले.
COMMENTS