रामवाडी नागरी सुधार कृती समितीच्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रकाश वाघमारे, संजय परदेशी, सतीश लोखंडे, सलिम पठा...
शहरातील रामवाडी भागात तातडीने नाल्यांवरील अतिक्रमण हटवून साथीचे आजार टाळण्यासाठी स्वच्छता करण्याची तसेच नागरी सुविधा पुरविण्याची मागणी रामवाडी नागरी सुधार कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन महापालिकेत आयुक्त व सामान्य प्रशासन विभागाला देण्यात आले.
यावेळी प्रकाश वाघमारे, संजय परदेशी, सतीश लोखंडे, सलिम पठाण, नासीर शेख, किशोर उल्हारे, दिपक सरोदे, संकेत लोखंडे, सुभाष वाघमारे, बाळासाहेब खाडे, नितीन घोरपडे, फैय्याज शेख आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते.
काय आहेत समस्या...
रामवाडी भागात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असून नागरिक त्रस्त झाले आहेत. |
रामवाडी भागात सुमारे पाच हजार पेक्षा जास्त लोकवस्ती असून, याठिकाणी महानगरपालिकेकडून कुठल्याही प्रकारची नागरी सुविधा पुरवल्या जात नाहीत. वसाहतीमध्ये दैनंदिन स्वच्छता देखील केली जात नसल्याने ड्रेनेज लाईन अनेक महिन्यापासून तुंबली आहे. त्यात येथील काही नागरिकांनी ड्रेनेज लाईनच्या नाल्यांवर अतिक्रमण केलेले असल्याने त्याची साफसफाई करणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात पावसाचे पाणी साचून नाल्यातील घाण पाणी वर येत आहे. सदर अतिक्रमण हटविल्यास नाल्यांची स्वच्छता करता येणार आहे, मात्र याकडे मनपाचे प्रभाग अधिकारी, स्वच्छता निरीक्षक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
आरोग्याचा प्रश्न गंभीर; नागरिक धास्तावले
घाण पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. |
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या भागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून, या भागात साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वसाहतीत औषध फवारणी करण्यात येत नसल्याने नागरिक सातत्याने डेंगू मलेरिया सारख्या साथीच्या आजारांना बळी ठरत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागातील नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना पायी चालणेही मुश्कील झाले आहे. एखादी दुर्घटना घडल्यास या भागात रुग्णवाहिका किंवा अग्निशमक विभागाचा बंब देखील जाऊ शकत नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने ही गंभीर बाब असून, या भागातील अतिक्रमण त्वरीत हटवण्याची गरज आहे. तसेच या भागात पथदिव्यांची व्यवस्था नसल्याने नागरिकांना रात्री घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झालेली असून त्याची दैनंदिन स्वच्छता होत नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. या भागात असलेली अस्वच्छता व अतिक्रमणाची पाहणी करुन सदर प्रश्नी सोडविण्याची मागणी रामवाडी नागरी सुधार कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा नागरिकांसह सर्जेपुरा चौकात रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
COMMENTS